विद्युतीकरणाच्या भूमिपूजनाची रेल्वेकडून लगीनघाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:04 AM2021-02-15T04:04:26+5:302021-02-15T04:04:26+5:30
औरंगाबाद : मनमाड ते नांदेडदरम्यानच्या एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाच्या भूमिपूजनाची अखेर दक्षिण मध्य रेल्वेकडून लगीनघाईन सुरू झाली आहे. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते ...
औरंगाबाद : मनमाड ते नांदेडदरम्यानच्या एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाच्या भूमिपूजनाची अखेर दक्षिण मध्य रेल्वेकडून लगीनघाईन सुरू झाली आहे. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते आठवडाभरात हे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकाऱ्यांचे दौरे सुरू असून, भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर रविवारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम)उपिंदर सिंग यांनी भेट देऊन पाहणी केली. ३२० कोटी रुपये खर्च असलेल्या मनमाड-नांदेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा मार्ग काही दिवसांपूर्वीच मोकळा झाला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या कामाच्या भूमिपूजनाकडे लक्ष लागले आहे.
विद्युतीकरणाच्या भूमिपूजनानिमित्त औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील सोयीसुविधांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. रेल्वेस्टेशनवर आवश्यक ती कामे केली जात आहेत. काही ठिकाणी आता रंगकाम हाती घेतले जाणार आहे. भूमिपूजनाची कोनशिला कुठे बसवायची, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठविण्याचीही रेल्वेकडून जय्यत तयारी सुरू आहे. राजकीय श्रेयवादासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून भूमिपूजनाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.