इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे सोमवारी भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:52 AM2017-10-11T00:52:24+5:302017-10-11T00:52:24+5:30
केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शेंद्र्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. पी-३० मधील २ एकर जागेत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शेंद्र्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. पी-३० मधील २ एकर जागेत इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन १६ आॅक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत होत आहे, अशी माहिती देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रा. लि. चे संचालक सुरेश तोडकर, सीएमआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आशिष गर्दे, गौतम नंदावत आदींची उपस्थिती होती.
पहिल्या टप्प्यात २८ कोटी ५८ लाख रुपयांचे, तर दुस-या टप्प्यात २० कोटींचे अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. ४८ कोटी रुपयांच्या या क्लस्टरमुळे विभागात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळणार आहे. भूमिपूजनाचा नारळ फुटल्यानंतर २ वर्षांत काम पूर्ण होईल, असा दावा यावेळी करण्यात आला.
मराठवाडा आॅटो क्लस्टरच्या निर्मितीनंतर देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक क्लस्टर औरंगाबादेत होत आहे. पुणे आणि म्हैसूर येथेदेखील अशा प्रकारचे क्लस्टर प्रस्तावित असून, त्यांच्यापूर्वी औरंगाबादने भूमिपूजन होत आहे.
देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि. कॉमन फॅसिलिटी सेंटर या स्पेशल पर्पज व्हेकलअंतर्गत या क्लस्टरचे काम पूर्ण केले जाणार आहे. या क्लस्टरच्या डीपीआरला मान्यता मिळाली आहे. सीएमआयएच्या या प्रकल्पासाठी देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि. ही एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेकल) स्थापन करण्यात आलेली आहे. ५० कोटी रुपये गुंतवणुकीतून हे क्लस्टर उभे राहील. पहिल्या टप्प्यात २८ कोटी ५८ लाख रुपये अनुदान केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंजूर केले आहे. ७५ टक्के अनुदान केंद्र शासन देणार आहे. १० टक्के अनुदान महाराष्ट्र शासन आणि १५ टक्के अनुदानाचा वाटा देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. ही संस्था उचलणार आहे, असे सांगण्यात आले.