महिला रुग्णालयाचे महिनाभरात भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:26 PM2018-12-17T21:26:23+5:302018-12-17T21:26:44+5:30
औरंगाबाद : जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचे ...
औरंगाबाद : जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचे महिनाभरात भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली.
२०१९ मधील निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महिला रुग्णालयाचे भूमिपूजन करण्याची तयारी सुरु असल्याचे दिसते. अनेक वर्षे शोध घेण्यात आल्यानंतर अखेर महिला व नवजात शिशू रुग्णालयासाठी दूध डेअरीची २१ हजार ८५३ चौ.मी. जागा देण्यात आली आहे. दोन वर्षांत हे रुग्णालय उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जात आहे. महिला आणि नवजात, मुदतपूर्व, कमी वजनाच्या नवजात शिशूंवर याठिकाणी उपचार होतील. याठिकाणी असलेल्या इमारतींचे पाडकाम लवकरच हाती घेतले जाणार आहे. रुग्णालयाचे भूमिपूजन पुढील महिनाभरात होऊ शकेल, असे डॉ. लाळे म्हणाले.
घाटीतील प्रसूतिशास्त्र विभागात ९० खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात २१० खाटांची सेवा दिली जाते. त्यातही खाटा अपुऱ्या पडतात. काही दिवसांपूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती विभाग सुरु झाला.त्यामुळे घाटीवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. दोन ते तीन वर्षात महिला रुग्णालय झाल्यानंतर हा भार पूर्णपणे संपुष्टात येईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सुपर स्पेशालिटीची तयारी
घाटी रुग्णालयात उभारण्यात येणाºया सुपर स्पेशालिटी विभागाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे; परंतु पाणी आणि विजेच्या जोडणीची प्रक्रिया सुरु आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून उदघाटन उरकण्याची तयारी सुरु असल्याचे समजते.