सातारा-देवळाई १५ कोटींच्या कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:03 AM2021-02-14T04:03:21+5:302021-02-14T04:03:21+5:30
औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या वर्षी विकासकामांवर परिणाम झाला, तरीही आ. संजय शिरसाट यांनी ५० कोटींचा निधी खेचून आणला. ...
औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या वर्षी विकासकामांवर परिणाम झाला, तरीही आ. संजय शिरसाट यांनी ५० कोटींचा निधी खेचून आणला. आता यापुढे विकास कामांचा अनुशेष भरून निघेल, असे आश्वासित करीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सातारा-देवळाई वॉर्डातील १५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व यापूर्वी झालेल्या १० कोटींच्या कामांचे लोकार्पण केले. २५ कोटींच्या कामांचे लवकरच भूमिपूजन होणार आहे.
सातारा-देवळाईतील आमदार रोड, हायकोर्ट कॉलनी येथे आयोजित समारंभात रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी खा. चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ. संजय शिरसाट, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, सिद्धांत शिरसाट, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले, तुमचा आमदार हुशार असून, त्याला विकासकामांसाठी निधी कसा मिळवायचा हे माहिती असल्याने येथील कामे मार्गी लागत आहेत. नवीन शहर पाणीपुरवठा योजनेत या भागांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी सातारा आणि देवळाई भागातील नागरिकांची उपस्थिती होती.
विधानसभा निवडणुकीत त्रास झाला
आ. शिरसाट म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सातारा-देवळाईतील विकासकामांवरून अनेकांनी टीका करून त्रास दिला. त्याचवेळी ठरविले, सातारा-देवळाईला प्राधान्याने विकासकामे करायची. आता विकासकामे होत आहेत. मनपा या भागात खर्च करीत नाही. राज्य सरकारकडून निधी आणून कामे होत असली तरी त्या कामांना एनओसी देण्यासाठीही महापालिकेचे अधिकारी त्रास देतात.
फोटो: सातारा-देवळाईतील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. सोबत आ. संजय शिरसाट व लोकप्रतिनिधी.
फोटो: नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करताना आ. संजय शिरसाट, सिद्धांत शिरसाट. सोबत कुटुंबातील सदस्य आणि पक्ष पदाधिकारी.