आचारसंहिता संपताच महापालिकेच्या २ हजार कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:48 PM2020-12-02T17:48:08+5:302020-12-02T17:51:55+5:30
बहुचर्चित नवीन पाणी पुरवठा योजनेला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिका शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांपर्यंतची ही विकास कामे आहेत. बहुचर्चित नवीन पाणी पुरवठा योजनेला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सोपविले. प्राधिकरणाने अल्पावधीत कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. आता अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे फाईल प्रलंबित आहे.
सफारी पार्कच्या कामाचे भूमिपूजन
मिटमिटा येथे सफारी पार्क उभारण्यात येणार आहे. सफारी पार्क शंभर एकर जागेवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी स्मार्ट सिटीकडून निविदासुद्धा काढण्यात आलेली आहे. आचारसंहितेनंतर या कामाला सुरुवात होऊ शकते.
१५२ कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा होणार
शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत म्हणून राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. एमआयडीसी, महापालिका आणि रस्ते विकास महामंडळातर्फे रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी एमआयडीसीत ५० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू केली. रस्ते विकास महामंडळ आणि महापालिकेने कामाचा श्रीगणेशा केलेला नाही. आचारसंहिता संपताच शासनाकडून निधीसुद्धा प्राप्त होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान
एमजीएम परिसरात २५ कोटी रुपये खर्च करून बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रकल्पामध्ये विशेष लक्ष घातलेले आहे. डिसेंबरमध्ये या कामाचा शुभारंभ होईल.
१७६ कोटींचा एमएसआय प्रकल्प
मास्टर सिस्टिम इंटिग्रेशन (एमएसआय) या प्रकल्पासाठी १७६ कोटींची तरतूद केली आहे. यातून सातशे सीसीटीव्ही कॅमेरे, ५० डिजिटल डिस्प्ले बोर्ड, महापालिका आणि पोलीस आयुक्तालयात कमांड कंट्रोल सेंटर, वाहतूक नियम फलक व झेब्रा क्रॉसिंग ही कामे होणार आहेत. सीसीटीव्ही बसविण्याचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.