संचारबंदीत केलेले भूमिपूजन अंगलट; संजय शिरसाटसह ३५ ते ४० जणाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:25 PM2021-04-27T12:25:23+5:302021-04-27T12:27:57+5:30
FIR against MLA Sanjay Shirsat बजाजनगरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांनी केले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी होते.
वाळूज महानगर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असताना बजाजनगरात जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन करणे आमदार संजय शिरसाट यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शिरसाट यांच्यासह ३५ ते ४० पदाधिकाऱ्यांविरुद्ध रविवार (दि.२५) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे जिल्हाभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेच्या वतीने संचारबंदी आदेशाला केराची टोपली दाखवित रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बजाजनगरातील जयभवानी सोसायटीमध्ये नवीन जलवाहिनीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता या जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सरपंच सचिन गरड, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, बबन सुपेकर, कृष्णा राठोड, कैलास चव्हाण, सुनील काळे, जितेंद्र जैन, कैलास भोकरे, पोपट हंडे, शिल्पा नरवडे, अर्चना जाधव, सुनीता गाडे, सविता काकडे आदींची उपस्थिती होती.
संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून भूमिपूजनाचा कार्यक्रम घेणारे आमदार संजय शिरसाट तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी ‘डावात माचळा पार्टी’चे भारत फुलारे यांनी पोलीस आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, याप्रकरणी पो.कॉ.विनोद नितनवरे यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री आमदार संजय शिरसाट यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत.