उद्धव ठाकरेंच्या हस्ते दोन हजार कोटींच्या विकासकामांचे आज भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:17+5:302020-12-17T04:24:17+5:30
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शहरात पहिल्यांदाच विकासकामांचा धूमधडाका सुरू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुमारे दोन ...
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शहरात पहिल्यांदाच विकासकामांचा धूमधडाका सुरू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुमारे दोन हजार कोटींच्या कामांचे शनिवारी गरवारे क्रीडा संकुलावर दूरसंवाद पद्धतीने दुपारी १ वाजता भूमिपूजन केले जाणार आहे. १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, १४७ कोटींचे सफारी पार्क, १५३ कोटींचे रस्ते व २३ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा यात समावेश आहे.
शहराचा पाणीप्रश्न १५ वर्षांपासून तापत होता. समांतर पाणीपुरवठा योजनेचा प्रयोग यशस्वी झाला. गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम केले जात असून, पहिल्या टप्प्यातील कामाची १३०८ कोटी रुपयांची निविदा अंतिम करण्यात आली आहे. ही योजना पूर्णत्वास आल्यास शहराचा २०५२ पर्यंचा पाणीप्रश्न मिटणार आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री गुलाब पाटील, संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचवेळी इतर तीन कामांचे भूमिपूजनही होईल.
स्मारक, सफारी पार्क, रस्ते
सिडकोत सात हेक्टर जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृती उद्यान उभारले जाणार आहे. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी स्मारकासाठी जागेची निवड केली होती. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या संकल्पनेनुसार डिझाईन तयार करून घेतले आहे. या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच मिटमिटा येथे स्मार्ट सिटी योजनेतून सफारी पार्क विकसित केले जाणार आहे. त्यासाठी १४७ कोटी रुपये खर्च केला जाणार असून शासनाने ८४ हेक्टर जमीन दिली आहे. सफारी पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या समारंभात भूमिपूजन होईल. शहरात शासन निधीतून १५२ कोटींचे २३ रस्ते तयार केले जात आहेत. ही कामे सुरू झाली असली तरी या समारंभात आभासी पद्धतीने भूमिपूजन होणार आहे.
--------------