महिला रुग्णालयाच्या कामाचे महिनाभरात भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:02 AM2021-01-13T04:02:26+5:302021-01-13T04:02:26+5:30
औरंगाबाद : शहरासाठी मंजूर असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या कामाचे महिनाभरात भूमिपूजन केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश ...
औरंगाबाद : शहरासाठी मंजूर असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या कामाचे महिनाभरात भूमिपूजन केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या रुग्णालयाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळण्याची चिन्हे आहेत.
गेल्या ७ वर्षांपासून केवळ कागदावर असलेल्या २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीला अखेर गती मिळणार असल्याचे दिसते. २९ ऑगस्ट २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयासाठी दूध डेअरीची जागा आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून ११ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता. २० सप्टेंबर रोजी रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान बांधाकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली व ११ नोव्हेंबर रोजी प्रशासनाला मिळालेल्या पत्रानुसार १११ कोटी ८९ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाल्याचे कळविण्यात आले. कोरोनामुळे गेले वर्षभर मंजूर असलेल्या या रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच आता लवकरच या रुग्णालयाची उभारणी सुरू होईल, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले.
४ मजली इमारत, ८४ निवासस्थाने
धर्मशाळा प्रस्तावित रुग्णालयाची तळमजला आणि ४ मजली इमारत राहणार आहे. तर वर्ग १ ते वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी ८४ निवासस्थाने आहेत. एक धर्मशाळा ही प्रस्तावित आहे.
घाटीबद्दल अभिमान
माझ्या जन्म घाटी रुग्णालयात झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालय आणि शहराविषयी अभिमान असल्याचे राजेश टोपे यावेळी म्हणाले.