नळदुर्गमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन
By Admin | Published: July 14, 2014 11:54 PM2014-07-14T23:54:36+5:302014-07-15T00:54:07+5:30
उस्मानाबाद : नळदुर्ग आणि परिसरातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यावरील उपचारांसाठी अद्ययावत असे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारणी कामाचा शुभारंभ
उस्मानाबाद : नळदुर्ग आणि परिसरातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यावरील उपचारांसाठी अद्ययावत असे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारणी कामाचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाला. तात्काळ आरोग्य उपचारांसाठी १०८ क्रमांक डायल करून मिळणाऱ्या सुविधांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळाही यावेळी पार पडला.
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आपली भूमिका असल्याचे पालकमंत्री चव्हाण यावेळी म्हणाले. अध्यक्षस्थानी खा. रवींद्र गायकवाड होते. यावेळी जि. प. अध्यक्ष सुभाष व्हट्टे, आ. ज्ञानराज चौगुले, संजय पाटील दूधगावकर, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, माजी आ. सि. ना. आलुरे गुरुजी व नरेंद्र बोरगावकर, तुळजापूर विकास प्राधीकरणाचे आप्पासाहेब पाटील, सभापती पंडित जोकार, धीरज पाटील, सुधाकर गुंड, सचिन पाटील, शहबाज काझी, उपनगराध्यक्षा अपर्णा बेडगे, गोदावरी केंद्रे, नारायण समुद्रे, अशोक जवळगे, पार्वती घोडके, प्रकाश चव्हाण, नय्यरपाशा जहागीरदार, सुनील चव्हाण, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता एस. आर. कातकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण, कार्यकारी अभियंता ए. जी. देशपांडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, नळदुर्ग येथे बऱ्याच वर्षापासूनची मागणी प्रलंबित होती. जागेअभावी हा प्रश्न मार्गी लावता येत नव्हता. मात्र तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत पुढाकार घेऊन नगरपालिकेच्या आणि वनविभागाच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावला. या कामासाठीचा २१ कोटी रुपयांचा निधी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्याने हे काम अधिक गतीने पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नळदुर्ग हे महामार्गावरील गाव असल्याने आणि अपघाताचे प्रमाण वाढल्याने येथे ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता होती. असेही ते म्हणाले. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय तसेच नर्सिंग कॉलेज उमरगा येथील ट्रामा केअर सेंटर, तुळजापूर ग्रामीण रुग्णालय, वाशी आणि बेंबळी येथील आरोग्य सुविधांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान या कार्यक्रमाला आ. ओम राजेनिंबाळकर, आ. बसवराज पाटील आ. दिलीपराव देशमुख यांच्यासह राहुल मोटे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुरेश बिराजदार यांची अनुपस्थिती होती. (प्रतिनिधी)
पाच एकरावरील ५० खाटांच्या या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत ७ वैद्यकीय अधिकारी, १५ नर्सेस, २४ तंत्रज्ञ व कर्मचारी, रुग्णवाहिका, एक्स-रे मशीन, एमआरआय मशीन, विशेष दक्षता कक्ष, आंतर व बाह्य रुग्ण कक्ष, कर्मचारी निवासस्थाने, पाच दिवसापर्यंत विच्छेदनाशिवाय शव ठेवता येईल, अशी सोय असलेले अद्ययावत शीतगृह, अद्ययावत शवविच्छेदन कक्ष याशिवाय सर्व सोयींनी युक्त अशा तीन रुग्णवाहिकांचा समावेश असणार आहे.