औरंगाबादचे भूमिपुत्र रोहित बिर्ला कतारमध्ये ‘भारत को जानिये क्विझ’मध्ये चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 07:33 PM2021-01-11T19:33:25+5:302021-01-11T19:37:31+5:30
कतार येथील भारतीय दूतावासातर्फे शनिवारी भारतीय सांस्कृतिक केंद्र, दोहा येथे १६ वे ‘प्रवासी भारतीय दिन संमेलन’ नवी दिल्ली येथून थेट प्रक्षेपण आभासी पद्धतीने आयोजित केले होते.
- योगेश पायघन
औरंगाबाद : प्रवासी भारतीय दिनानिमित्त शनिवारी (दि. ९) आभासी पद्धतीने आयोजित प्रवासी भारतीयांच्या संमेलनात ‘भारत को जानिये क्विझ’च्या १५ विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत सोयगाव येथील रोहित बिर्ला यांनी कतार येथे अनिवासी भारतीय गटातून बाजी मारली. विजेते केंद्र शासनाकडून १५ दिवसांच्या ‘भारत दर्शन’ यात्रेचे मानकरी ठरले.
कतार येथील भारतीय दूतावासातर्फे शनिवारी भारतीय सांस्कृतिक केंद्र, दोहा येथे १६ वे ‘प्रवासी भारतीय दिन संमेलन’ नवी दिल्ली येथून थेट प्रक्षेपण आभासी पद्धतीने आयोजित केले होते. या कार्यक्रमास कतारमधील प्रख्यात भारतीय प्रवासी आणि कतारमधील भारतीय राजदूतासमवेत दूतावासअंतर्गत सर्वोच्च संस्थाप्रमुखांनी हजेरी लावली. कतार देशातील भारतीय राजदूत डॉ. दीपक मित्तल यांच्या हस्ते रोहित बिर्ला यांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक प्रवासातील यशानंतर अभियंता असलेल्या रोहित यांनी कॅम्पस सिलेक्शन होऊन कंपनीतही त्याच्या कर्तृत्वाला साजेल अशी कामगिरी केल्याने अनेकदा त्यांना गौरविले गेले.
या स्पर्धेची तिसरी फेरी जिंकल्यावर त्यांनी चौथी फेरी जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सोयगाव येथील व्यापारी दिलीप बिर्ला यांचा मुलगा रोहित हे विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद प्रशाला सोयगावच्या शिक्षकांसह, विद्यार्थी, मित्रपरिवार, सोयगावकरांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. कोविडमुळे दीड वर्षांपासून मायदेशी येऊ न शकल्याचे सांगत लवकर परिस्थिती निवळल्यावर गावाकडे येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विजेत्यांना केंद्राकडून १५ दिवस भारत दर्शन
परदेशी राहणाऱ्या युवा विदेशी भारतीयांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाद्वारे ‘भारत को जानिये क्विझ’ २०१५-१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. या वर्षी २०२०-२१ चे हे तिसरे वर्ष होते. ३० सप्टेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान हे क्विझ चार फेऱ्यांत झाले. या स्पर्धेचा विजयी पुरस्कार म्हणून १५ दिवसांची भारत दर्शन यात्रा भारत सरकारमार्फ़त प्रायोजित असते. ती यात्रा कोविड संक्रमण नियंत्रणानंतर आयोजित केली जाणार असल्याचे रोहित यांनी सांगितले.