बीबी का मकबराही गायब होऊ शकतो; दैवीशक्तीने नव्हे तर 'असा' करता येईल हा चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 04:16 PM2022-06-25T16:16:31+5:302022-06-25T16:57:54+5:30
जादू हे विज्ञान, दैवी शक्ती नाही
औरंगाबाद :बीबी का मकबराही जादूगार गायब करू शकतो. एका व्यक्तीचे दोन तुकडे करणे व पुन्हा जोडणे असे प्रयोग फक्त रंगमंचावरच यशस्वी होऊ शकतात. ही दैवीशक्ती नव्हे तर विज्ञानाचा चमत्कार आहे. खुल्या मैदानात प्रत्यक्षात हजारो लोकांसमोर प्रयोग करणे जगातील कोणत्याही जादुगाराला शक्य नाही, अशी स्पष्टोक्ती लोकप्रिय जादुगार जितेंद्र रघुवीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
प्रयोगानिमित्त औरंगाबादेत आलेल्या जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले की, रघुवीर जादुगार हे माझे आजोबा. त्यांनी ८३ वर्षांपूर्वी जादूचे प्रयोग सादर करायला सुरुवात केली. या कलेला भाषेचे व वयाचे बंधन नाही. विजय रघुवीर हे माझे वडील. त्यांनी जादूच्या प्रयोगात ‘तंत्रज्ञान’ आणले. आता मी जादूचे प्रयोग करतो यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला. एखाद्या व्यक्तीचे दोन तुकडे करणे, एखाद्या मुलीला हवेत तरंगविणे, एखाद्या तरुणाची मान कापणे, हवेत हात फिरवून वस्तू काढणे किवा डोळ्यांवर पट्टी बांधून दुचाकी चालविणे. हे प्रयोग तेच आहेत. जे आजोबा व वडील करायचे. पूर्वी जादूचा प्रयोग करताना रंगमंचावर लाईट डिम करावे लागत असे. ज्या व्यक्तीचे दोन तुकडे करत ती व्यक्ती आम्ही प्रशिक्षण दिलेली व्यक्ती असे. आता प्रशिक्षित व्यक्तीची गरज नाही. आम्ही समोर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला रंगमंचावर बोलावून जादूचे प्रयोग करतो.
जादू हे विज्ञान, दैवी शक्ती नाही
भोंदूबाबा दैवीशक्तीच्या नावाखाली अनेक जणांना फसवत असतात. पैशांचा पाऊस पाडणे, हातातून साखळी काढणे, सोने दुप्पट करून देणे असे प्रयोग करतात व लोक त्याला फसतात. मुळात हा दैवी चमत्कार नाही, तर या पाठीमागे विज्ञान दडलेले आहे. हे नागरिकांनी समजून घ्यावे. ते नारळ, फणस काढत नाहीत, कारण, ते लपवून ठेवण्याएवढी हातात जागा नसते. असे जितेंद्र रघुवीर म्हणाले.