पर्यटकांमुळे बीबीका मकबरा गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:02 AM2018-06-18T01:02:25+5:302018-06-18T01:02:53+5:30
ईद आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी पर्यटकांसाठी पर्वणी ठरली. शहरातील ऐतिहासिक बीबीका मकबरा रविवारी (दि. १७) स्थानिक पर्यटकांबरोबरच देश आणि विदेशातून आलेल्या पर्यटकांनी गजबजून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ईद आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी पर्यटकांसाठी पर्वणी ठरली. शहरातील ऐतिहासिक बीबीका मकबरा रविवारी (दि. १७) स्थानिक पर्यटकांबरोबरच देश आणि विदेशातून आलेल्या पर्यटकांनी गजबजून गेला.
राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील बीबीका मकबरा येथे रविवारी तिकिट विक्री खिडकीवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची या ठिकाणी अक्षरश: झुंबड उडाली. स्थानिक रहिवाशांसह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने पर्यटक औरंगाबादेत आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी होती. एरव्ही सुटीच्या दिवशी मकबऱ्याला पर्यटकांची चांगली गर्दी असते; परंतु रविवारी इतर दिवसांपेक्षा अधिक गर्दी असल्याची माहिती बीबीका मकबरा येथील कर्मचा-यांनी दिली. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे तिकिटाचे कक्ष वाढविणे गरजेचे होते; परंतु तसे न केल्याने पर्यटकांचे चांगलेच हाल झाले. महिला आणि पुरुष असे दोनच कक्ष सुरूहोते. या ठिकाणी प्लास्टिक नाण्याच्या स्वरूपात सध्या तिकिट देण्यात येते. हे प्लास्टिकचे नाणे मकब-यात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरील यंत्रावर दाखविणे आवश्यक ठरते; परंतु तिकिट कक्षात हे नाणे संपल्यामुळे दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेकडो पर्यटकांना ३० ते ४५ मिनिटे ताटक ळावे लागले. याविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ब-याच प्रतीक्षेनंतर ही नाणी कक्षात दाखल झाली. येथील पार्किं गदेखील वाहनांनी भरून गेली होती.