१० संघ, ३०० खेळाडू; एपीएलच्या दहाव्या पर्वासाठी आज रंगणार खेळाडूंची बोली प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:45 PM2023-01-11T12:45:26+5:302023-01-11T12:45:57+5:30
मराठवाड्यातील सर्वांत मोठा क्रिकेटचा संग्राम ठरणाऱ्या या स्पर्धेसाठी ३०० खेळाडूंवर दहा संघांतील फ्रँचायझी बोली लावतील.
औरंगाबाद : ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान गरवारे क्रिकेट स्टेडियमवर बाकलीवाल अँड सन्स प्रस्तुत लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या लोकमत औरंगाबाद क्रिकेट प्रीमिअर लीग (एपीएल)चे दहावे पर्व रंगणार आहे. या बहुप्रतीक्षित प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आज, बुधवारी, दि. ११ जानेवारी रोजी खेळाडूंची बोली प्रक्रिया रंगणार आहे. लोकमत भवन येथे दुपारी २.३० वाजता बोली प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे.
मराठवाड्यातील सर्वांत मोठा क्रिकेटचा संग्राम ठरणाऱ्या या स्पर्धेसाठी ३०० खेळाडूंवर दहा संघांतील फ्रँचायझी बोली लावतील. यात आयकॉन खेळाडूंचा समावेश असणार नाही. प्रत्येक संघात १५ खेळाडू असतील. बोली प्रक्रियेदरम्यान खेळाडूचे नाव भव्य स्क्रीनवर दाखवण्यात येईल. त्यानुसार संघ मालकांना बोली लावता येईल. बोलीदरम्यान एखाद्या खेळाडूवर बोली लागली नाही तर त्यानंतरच्या खेळाडूचे नाव घोषित होऊन बोली प्रक्रिया पुढे सुरू राहील. आधी बोली न लागलेल्या खेळाडूंना पुढील फेरीतही संधी असेल.
१० संघांसाठी लागणार बोली
३०० खेळाडूंसाठी संघ मालक बोली लावतील. करण राजपाल यांचा मनजित प्राइड वर्ल्ड (प्रतापनगर), मिहीर मुळे यांचा ग्रीन गोल्ड सान्या (उस्मानपुरा), श्याम अग्रवाल यांचा शक्ती स्ट्रायकर्स (आकाशवाणी), कैलास जैन यांचा जेन्युएन रॉयल्स (बाबा पेट्रोल पंप), राजेश शिंदे यांचा शिंदे रायझिंग किंग्ज (क्रांती चौक), संदीप नागरे यांचा भवानी टायगर्स (सिडको), असिफ पटेल यांचा पटेल किंग वॉरियर (पीरबाजार), के. एस. राव यांचा राव रॉयल्स (सेव्हन हिल्स), हर्षवर्धन कराड यांचा कराड हॉक्स (कोटला कॉलनी), गुड्डू वाहूळ यांचा गुड्डू ईएमआय २१ (हडको) हे दहा संघ त्यांचा संघ मजबूत करण्यासाठी खेळाडूंवर बोली लावतील.
बोली प्रक्रियेदरम्यान आयकॉन खेळाडू, संघ मालक आणि त्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करतील. प्रत्येक संघ मालकांना बोली लावण्यासाठी एकूण १५०० पॉइंट्स देण्यात आले आहेत. त्यापैकी काही पॉइंट्स आयकॉन खेळाडूंवर आधीच खर्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मजबूत संघ निवडण्यासाठी संघ मालकांना पाॅइंट काळजीपूर्वक खर्च करावे लागतील.
आपला संघ मजबूत करण्यासाठी सूर गवसलेल्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रमुख खेळाडूंपेक्षा एखाद्या नवख्या खेळाडूंवर जास्ती बोली लागल्यास आश्चर्य असणार नाही. संघ बांधताना युवा आणि अनुभवी खेळाडूंचा मिलाफ याकडेही संघ मालकांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आता आपला ड्रीम संघ निवडताना ते कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात खेचतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
बोली प्रक्रियेसाठी असे असतील नियम:
-१५ खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी प्रत्येक संघाला १५०० पॉइंट्स असतील.
-यात १६ व १९ वर्षांखालील १ जणांचा प्रत्येक संघात समावेश असेल.
-प्रत्येक खेळाडूंसाठी बेस पॉइंट ५० असेल.
-बेस पॉइंट प्रत्येकी १० च्या फरकाने वाढवता येईल.
-बोलीदरम्यान खेळाडूंचे नाव स्क्रीनवर दाखवण्यात येईल. त्यानंतर संघ मालकांना खेळाडूंवर बोली लावता येईल.
-प्रत्येक फेरीनंतर खेळाडूंच्या बोली प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त पॉइंटची किती मर्यादा आहे हे स्क्रीनवर दाखवण्यात येईल.
-लोकमत भवन येथे बोली प्रक्रियेदरम्यान संघ मालक आणि आयकॉन खेळाडूंसह एकूण पाचजणांनाच उपस्थित राहता येईल.
-खेळाडूंना पूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्या संघासोबत राहावे लागेल. स्पर्धा अर्धवट सोडणाऱ्या खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी लागली जाईल.