नृत्यात बीडचे चिमुकले देशात अव्वल
By Admin | Published: June 13, 2014 11:49 PM2014-06-13T23:49:40+5:302014-06-14T01:19:29+5:30
सोमनाथ खताळ, बीड दिवसेंदिवस बीड जिल्ह्यातील कलाकार विविध कला सादर करून बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करीत आहेत. हे नाव उज्ज्वल करण्यात चिमुकल्यांपासून ते वृद्धापर्यंतचा समावेश आहे.
सोमनाथ खताळ, बीड
दिवसेंदिवस बीड जिल्ह्यातील कलाकार विविध कला सादर करून बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करीत आहेत. हे नाव उज्ज्वल करण्यात चिमुकल्यांपासून ते वृद्धापर्यंतचा समावेश आहे. असेच पुन्हा एकदा आपल्या मराठमोळी लावण्या सादर करून बीडच्या साक्षी आंधळे, राजनंदिनी वाघ, विशाखा बाळशंकर, प्रगती सूर्यवंशी या चार चिमुकल्या रणरागिणींनी पुण्याचा रंगमंच गाजवला. तब्बल आठ हजार स्पर्धकांना मागे टाकत या चिमुकल्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
२१ मे ते १ जून या कालावधीत पुणे येथे अखिल भारतीय सांस्कृतीय संघ यांच्या वतीने ‘आॅल इंडीया मल्टी लिगल डान्स, ड्रामा, म्युझीक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण २४ राज्यातील आठ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत शिशुगट, बालगट आणि खुला गट असे तीन गट ठेवण्यात आले होते. या तिनही गटातून बीडच्या रणरागिणींनी बाजी मारली आहे. शिशुगटात साक्षी आंधळे प्रथम तर राजनंदिनी वाघ देशातून द्वितीय आली. बालगटात विशाखा बाळशंकर तर खुल्या गटातून प्रगती सूर्यवंशीने प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धकांनी मराठमोळी लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावरून एवढे मात्र निश्चित आहे, की लावणी ही आजही भारत वासियांच्या मनात घर करून आहे. यासर्व स्पर्धकांना राधाकृष्ण वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
बीडच्या मातीने मराठी चित्रपटात आपले वर्चस्व गाजवणाऱ्या मकरंद अनासपुरे सारखे अनेक कलाकार घडवले आहेत. या कलाकारांचा आदर्श ठेऊन आजही काही कलाकार आपल्या जिवाचे रान करीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे या कलाकारांच्या मेहनतीला यशही मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मला आत्मविश्वास होता.. साक्षी आंधळे
मी मॉडर्न जाज या कलाप्रकारात ‘मुजरा’ हे नृत्य सादर केले. हे नृत्य बसवताना मी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे मी बाजी मारणार असा विश्वास होता. माझे आई-वडील नेहमी प्रोत्साहित करीत होते.
मी यामध्येच करिअर करणार..-राजनंदिनी वाघ
मी माझे वडील रोज नृत्य शिकवितात. मी खुप मेहनत घेत असून मला पुढे चालून ‘डान्सर’ बनायचे आहे. इतर मुलींचे नृत्य पाहून मी या क्षेत्राकडे वळले.
मला डान्सिंगची खूप आवड आहे- विशाखा बाळशंकर
मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच नृत्याचा सराव करीत आहे. माझी मावशी करूना विद्यागर माझा दररोज सराव करून घेते. तिच्यामुळेच आज मी स्पर्धेत यशस्वी झाले आहे. ही माझी आवड असून मला इंजिनीअर बनायचे आहे.
आई व मोठी बहीणच माझे गुरू- प्रगती सूर्यवंशी
माझी आई कल्पना आणि मोठी बहीण पल्लवी यांचे नृत्य पाहूनच मला याची आवड निर्माण झाली. यामध्ये सध्या मला यश मिळत असून मला बीडमधून माझ्यासारखे अनेक डान्सर तयार करायचे आहेत. अॅक्टर आणि डान्सर होण्याची इच्छा असून मी अभ्यासाठीही खूप मेहनत घेत आहे.