मोठी कारवाई! खुलताबादेतील गुटखा निर्मितीचा कारखाना पोलिसांच्या विशेष पथकाकडून उध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 01:09 PM2024-08-08T13:09:14+5:302024-08-08T13:11:24+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता गोरखधंदा; एक ट्रक व २ दोन टेम्पो भरून कारखान्यातील साहित्य जप्त
- सुनील घोडके
खुलताबाद: खुलताबाद शहराजवळील मावसाळा ते खिर्डीरोडवरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला गुटखा( सुंगधित तंबाखू) निर्मितीचा कारखाना आयपीएस अधिकारी महक स्वामी यांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री उध्वस्त केला आहे. या प्रकरणात जवळपास २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएस अधिकारी असलेल्या महक स्वामी यांनी मावसाळा-खिर्डी रोडवरील या मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान छापा मारला. या गुटखा निर्मितीच्या कारखान्यात रात्री ११ वाजेपर्यंत एक एक साहित्य जमा केले. यात विविध तंबाखू, गुटखा निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मशिनरी हे सर्व साहित्य जप्त करून एक ट्रक व २ दोन टेम्पोत भरून रात्री खुलताबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा ताराचंद रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मोहमंद फरीद मोहमंद झकेरिया वय 50 वर्ष, अनिसाबानो मोहमंद फरीद वय 48 वर्ष ( दोन्ही रा.कटकट गेट हत्तीसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर), हुसेन मोहमंद सिध्दीकी झुडा वय 49 वर्ष, ईरफान हारुन तेली वय 45 वर्ष ( दोघे रा.सेवा मंगल कार्यालय खिर्डी ता.खुलताबाद) यांच्या विरूध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील आरोपीतांनी संगनमत करुन उपरोक्त महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखुची चोरटी विक्री करण्याकरिता साठा केला आहे. तसेच सुगंधिंत तंबाखू तयार करण्याच्या उद्देशाने कच्चे अन्न पदार्थ व पँकिंग करिता वापरण्यात येणारे साहित्याचा साठा केला आहे. तसेच सदर प्रतिबंधित अन्न पदार्थांची चोरटी वाहतूक करण्याच्या उद्देशाने वाहने बाळगल्याचे निदर्शनास आले. तसेच अवैधरित्या आर्थिक फायदा मिळविण्याच्या दृष्टीने खाणाऱ्या व्यक्तीस गंभीर दुखापत होऊ शकते याची जाणीव असून देखील कायद्याद्वारे विक्रीसाठी व उत्पादनासाठी प्रतिबंधित केलेला व जनतेच्या आरोग्यास अपायकारकसुगंधित तंबाखू हा विक्री करिता उत्पादन, पॅकिंग व वाहतुकीच्या उद्देशाने साठा करुन अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे उलंघन केले यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहे.
गेल्या वर्षी पत्रकारावर गुन्हा केला दाखल
खुलताबाद येथील एक पत्रकाराने गेल्या वर्षी या कारखान्यात शिरून गुटखा निर्मिती कशी होती याबाबत खुलासा केला होता. तेथील कामगार व मालकाच्या मुलाचे फुटेज देखील यात होते. मात्र, त्यानंतर या कारखान्याच्या मालकाने तत्कालीन पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याला हाताशी धरून पत्रकार अमोल काळे यांच्याच विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, बुधवारी झालेल्या कारवाईत कारखाना उघडकीस आल्याने या गुटखा निर्मिती कारखान्यास पोलीस प्रशासनातील मोठे अधिकारी व काही लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद असल्याची चर्चा खुलताबाद तालुक्यात सुरू आहे.