‘महारेरा’ची मोठी कारवाई! छत्रपती संभाजीनगरातील आठ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी स्थगित
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 22, 2023 12:48 PM2023-11-22T12:48:10+5:302023-11-22T12:48:51+5:30
मराठवाड्यातील एकूण दहा गृहप्रकल्पांवर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगर : आपल्या बांधकाम प्रकल्पाची माहिती ‘महारेरा’च्या साइटवर अपडेट केली नाही. यामुळे राज्यातील राज्यात २४८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरातील आठ बांधकाम प्रकल्पांचा समावेश आहे. ‘महारेरा’ने केलेली ही कारवाई मोठी मानली जात आहे.
का करण्यात आली कारवाई?
एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी ‘महारेरा’त केल्यानंतर, त्याची अद्ययावत माहिती ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर दर तीन महिन्यांनी देण्याची जबाबदारी त्या बांधकाम व्यावसायिकावर असते. ‘जानेवारी, फेब्रुवारी, मार्च’, ‘एप्रिल, मे, जून’, ‘जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर’ आणि ‘ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर’ अशा तीन-तीन महिन्यांची अद्ययावत माहिती द्यावी लागते. मात्र, अशी माहिती संकेतस्थळावर सादर करत नसल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली.
मराठवाड्यातील त्या दहा गृहप्रकल्पांवर प्रश्नचिन्ह
महारेराने माहिती अद्ययावत न करणाऱ्या २८४ गृहप्रकल्पांवर कारवाई केली. त्यात मराठवाड्यातील दहा प्रकल्पांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरातील ८ व जालना १ व बीड १ गृहप्रकल्प आहे. या प्रकल्पांचे काय होणार, त्या गृहप्रकल्पात जर ग्राहकांनी बुकिंग केली असेल तर त्यांचे काय होणार, त्या बांधकाम प्रकल्पाला पुढे काही अटींवर परवानगी देण्यात येईल का? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.
...तर स्थगिती उठू शकते
अल्पकालीन स्थगिती ही ‘महारेरा’च्या प्रक्रियेचा भाग आहे. प्रकल्पाच्या कार्यादरम्यान वेळोवेळी देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये तफावत आढळल्यास कारणे दाखवा नोटीस दिली जाते. कारणे दाखवा नोटीसनंतर गृहप्रकल्पास तात्पुरती स्थगिती दिली जाते, हा एक प्रक्रियेचा भाग असून संबंधित बांधकाम व्यावसायिक त्या कागदपत्रांची पूर्तता करून स्थगिती उठवू शकतात.
- रोहित सूर्यवंशी, सचिव, क्रेडाई