इसिस आणि नक्षलींचा हिंसाचार रोखण्याचे मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 06:58 PM2019-03-15T18:58:23+5:302019-03-15T18:58:23+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने उत्तम तयारी केल्याचा पोलीस महासंचालकांचा दावा
औरंगाबाद : इसिस आणि नक्षली विचाराने प्रभावित होऊन दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांचे मनसुबे धुळीस मिळविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. इसिस आणि नक्षली विचाराने प्रभावित होणाऱ्या तरुणांचे समपुदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करीत असून, यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाच्या तयारीचा आढावा बैठकीसाठी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे औरंगाबादेत आले होते. पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि आठ जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि शहरातील उपायुक्तांची उपस्थिती होती. बैठकीनंतर जयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आजच्या बैठकीत मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची तयारी संबंधित पोलीसप्रमुखांकडून जाणून घेण्यात आली. निवडणुका होईपर्यंत पोलिसांना युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे. पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरात गतवर्षी लहान-मोठ्या चार दंगली झाल्या होत्या, या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील निवडणुकीसाठी जास्त पोलीस बल देणार का, असे विचारले असता महासंचालक म्हणाले की, पोलीस आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना हवे तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. मराठवाड्यातील कोणता मतदारसंघ तुम्हाला संवेदनशील वाटला, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. राज्यात दोन जातींमध्ये तेढ निर्माण करून निवडणूक कालावधीत वातावरण खराब करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याबाबतचा गुप्तचर संस्थांकडून काही अहवाल आला आहे का, या प्रश्नाचे थेट उत्तर न देता त्यांनी गुप्तचर यंत्रणांकडून येणाऱ्या अहवालांवर आम्ही कार्यवाही करीत असतो, असे सांगितले.
पदानवत केलेल्या उपनिरीक्षकांबाबत माहिती घेतो
२०१३ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे चौदा हजार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावरून पदावनत करण्यात आले आहे. त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी कायमस्वरूपी पदस्थापना कधी देणार, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, हा विषय मला माहिती नाही, मला माहिती घेऊ न अभ्यास करावा लागेल.
लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात होईल
लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात व्हावी, यासाठी पोलीस यंत्रणा समर्थ आणि सज्ज आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काय करावे, याबाबतच्या सूचना याआधीच पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, नाकाबंदी करणे, हॉटेल्स, वाहने आणि लॉजेची तपासणी करणे आदी कामे सुरू करण्यात आली.
सोशल मीडियाविषयी तक्रार आल्यास कारवाई
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळे सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन केला आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना महासंचालक म्हणाले की, सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह मजकूर कोणी टाकला आणि याबाबत तक्रार आली तर पोलिसांकडून कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.