औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय; आता शहरवासीयांना मिळणार चार दिवसांआड पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:55 PM2022-07-05T14:55:54+5:302022-07-05T14:57:06+5:30

सोमवारी सायंकाळी स्मार्ट सिटीच्या सभागृहात प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.

Big decision of Aurangabad Municipal Corporation; Now the citizens will get water for four days | औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय; आता शहरवासीयांना मिळणार चार दिवसांआड पाणी

औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय; आता शहरवासीयांना मिळणार चार दिवसांआड पाणी

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात सध्या पाच दिवसांआड म्हणजेच नागरिकांना सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. यामध्ये सुधारणा करीत आता चार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय सोमवारी रात्री घेण्यात आला. मरीमाता, पहाडसिंगपुरा आणि जिन्सी जलकुंभ वगळता शहरात सर्वत्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तीन दिवसांआड पाणी कसे देता येईल, या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करणार आहे.

सोमवारी सायंकाळी स्मार्ट सिटीच्या सभागृहात प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता एम.बी. काझी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजयसिंग, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन महिन्यांपासून मनपा प्रशासनाने पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी कंबर कसली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मदतीने ४१ कलमी सुधारणा कार्यक्रम सुरू करण्यात आला. हर्सूल तलावातून अतिरिक्त ५ एमएलडी, जायकवाडीतून अतिरिक्त ५ एमएलडी, नहर-ए-अंबरीतून पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला. टँकर एमआयडीसी, खासगी विहिरींवरून भरण्यास सुरुवात केल्याने पाण्याची बचत होऊ लागली. सोमवारी रात्री बैठकीत सर्वानुमते चार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मरीमाता, पहाडसिंगुरा, जिन्सी या जलकुंभावर तूर्त अंमलबजावणी शक्य नाही. तेथे थोडा कालावधी लागेल.

३५० नळ कनेक्शन कट
शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर १३०० अनधिकृत नळ असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले. त्यातील ३५० नळ कापण्यात आल्याची माहिती वाहुळे यांनी बैठकीत दिली. उद्यापासून मनपाच्या नागरी मित्र पथकाचे सैनिक घेऊन नळ खंडित करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील आदेशापर्यंत पाणीपुरवठ्याचे कामकाज एम. बी. काझी पाहतील.

गळत्या थांबवा अन्यथा...
उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या पथकाने गळत्या थांबविण्यासंदर्भात अहवाल सादर केला. त्यानुसार संबंधित कनिष्ठ अभियंते, उपअभियंते यांना पत्र देण्यात आले. अनेक ठिकाणी कामच झाले नाही. गळत्या थांबल्या नाहीत तर थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या एनर्जी ऑडिटची निविदा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

१०० वॉल्व्हवर अत्याधुनिक यंत्रणा
प्रायोगिक तत्त्वावर शहरातील १०० वॉल्व्हवर अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येईल. वॉल्व्ह किती वाजता सुरू व बंद केला, याची माहिती नियंत्रण कक्षाला कळेल. स्मार्ट सिटीच्या जलबेल ॲपला १० हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला. १० जुलैपासून संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे अपडेट यावर पाहायला मिळेल, असे बैठकीत सांगण्यात आले.

Web Title: Big decision of Aurangabad Municipal Corporation; Now the citizens will get water for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.