कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:52 PM2020-10-08T12:52:05+5:302020-10-08T12:52:44+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी तब्बल ५१ दिवसांनंतर रूग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. दिवसभरात १२० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली असून ३०३ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी तब्बल ५१ दिवसांनंतर रूग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. दिवसभरात १२० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली असून ३०३ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर इतर जिल्ह्यातील १ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात दि. १७ ऑगस्ट रोजी ६४ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर रूग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. यानंतर बुधवारी १२० जणांचे निदान झाले. गेल्या ५१ दिवसांतील ही सर्वात कमी रूग्णसंख्या ठरली आहे. या नव्या १२० रूग्णांत ग्रामीण भागातील ४९, मनपा हद्दीतील २५ आणि अन्य ४६ रूग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्र्ह्याचे हे चित्र असताना मराठवाड्यात ८८७ कोरोनाबाधितांची भर पडली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात २०९, लातूरमध्ये १७४, बीडमध्ये १३७, उस्मानाबाद येथे ९०, परभणी येथे ८०, जालना येथे ३८ तर हिंगोली येथे १९ रूग्ण आढळून आले आहेत.