महापालिकेच्या सोडतीत एस. टी. प्रवर्गाच्या वार्ड आरक्षणातही मोठा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:19 PM2020-02-06T12:19:06+5:302020-02-06T12:25:44+5:30

२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिकेला शहरातील ११५ वॉर्डांमध्ये एस.टी. प्रवर्गासाठी दोन वॉर्ड आरक्षित करायचे होते.

big fraud in the municipal corporation's ST ward reservation | महापालिकेच्या सोडतीत एस. टी. प्रवर्गाच्या वार्ड आरक्षणातही मोठा घोळ

महापालिकेच्या सोडतीत एस. टी. प्रवर्गाच्या वार्ड आरक्षणातही मोठा घोळ

googlenewsNext
ठळक मुद्देवॉर्ड रचना करतानाच लोकसंख्येत फेरबदलआक्षेप व हरकतींचा महापालिकेच्या निवडणूक विभागावर पाऊस

औरंगाबाद : महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झालेला असतानाच झारीतील शुक्राचार्यांनी अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) वॉर्ड आरक्षणातही मोठ्या प्रमाणात घोळ केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. नवाबपुरा वॉर्ड एस.टी. प्रवर्गात जाऊ नये म्हणून वॉर्ड रचना तयार करतानाच या वॉर्डातील एस.टी.ची लोकसंख्या कमी करण्यात आली. नवाबपुऱ्यावर आलेले संकट रोजेबाग वॉर्डावर नेण्यात आले.

२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिकेला शहरातील ११५ वॉर्डांमध्ये एस.टी. प्रवर्गासाठी दोन वॉर्ड आरक्षित करायचे होते. एस.टी. प्रवर्गाची लोकसंख्या कोणत्या वॉर्डात किती आहे, याचे आकडेही मनपाकडे उपलब्ध होते. उतरत्या क्रमाने दोन वॉर्डांमध्ये आरक्षण टाकायचे होते. लोकसंख्येचा निकष लावला, तर वॉर्ड क्रमांक ३ एकतानगर अनुसूचित जातीसाठी राखीव होण्यास ४५७ लोकसंख्या होती. त्या खालोखाल नवाबपुरा वॉर्डाची लोकसंख्या ४२५ होती. हा वॉर्ड थेट एस.टी. प्रवर्गात जात असल्याचे वॉर्ड रचना तयार करणाऱ्यांच्या लक्षात आले. महापालिकेत पूर्वाश्रमीचा कंत्राटदार असलेल्या एका विद्यमान नगरसेवकाचे या वॉर्डात पुनर्वसन करायचे होते, अशा कठीण परिस्थितीत अधिकारीही मिठाला जागले. त्यांनी नवाबपुरा वॉर्डातील तेलंगवाडा हा परिसर थेट कैसर कॉलनीत टाकला. तेलंगवाडा येथील एस.टी. प्रवर्गाचे मतदान कमी करण्यात आले. नव्याने तयार करण्यात आलेल्या नवाबपुरा वॉर्डात एस.टी.ची लोकसंख्या २०४ वर आणण्यात आली. त्यामुळे हा वॉर्ड आरक्षित होत नव्हता.

अखेर दुसरा कोणता वॉर्ड आरक्षित करायचा यावर मंथन झाले. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मोहन भैया मेघावाले यांच्या रोजेबाग वॉर्डात एस.टी. प्रवर्गाची लोकसंख्या ३२९ होती. त्यामुळे थेट या वॉर्डावर आरक्षण टाकण्यात आले. आता एवढे सर्व ढळढळीत पुरावे उपलब्ध झाल्यानंतरही वॉर्ड रचना, वॉर्ड आरक्षण ‘सब कुछ मॅनेज’नाही, असे म्हणताच येणार नाही. उलट एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण टाकताना मॅनेज कशा पद्धतीने केले होते याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.

सहा किलोमीटरचा कुठे वॉर्ड असतो का...?
महापालिकेने तयार केलेल्या नवीन वॉर्ड रचनेवर आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. वॉर्डांच्या सीमा बदलताना निवडणूक आयोगाने दिलेले निर्देशही पाळण्यात आले नाहीत. भीमनगर उत्तर या वॉर्डाला तब्बल सहा किलोमीटर अंतरावर असलेला पहाडसिंगपुरा, हनुमान टेकडी हा भाग जोडण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. सहा किलोमीटरचा कुठे वॉर्ड असतो का? असेही आक्षेपकर्त्याने नमूद केले.माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी दाखल केलेल्या आक्षेपात नमूद केले की, भीमनगर उत्तर या वॉर्डाच्या सीमा जुन्याच पद्धतीने योग्य होत्या. नव्या प्रारूप आराखड्यात या वॉर्डाला हनुमान टेकडी, बीबीका मकबरा पाठीमागील भाग जोडण्यात आला आहे. हे अंतर तब्बल सहा किलोमीटर एवढे आहे. 

रिपाइं आठवले गटातर्फे आक्षेप सादर करण्यात आला आहे. त्यात वॉर्ड क्रमांक ८१ संजयनगरमधून वगळून वॉर्ड क्रमांक ८७ मध्ये जोडण्यात आलेल्या एक ते सहा नंबरच्या गल्ल्या पुन्हा वॉर्ड क्रमांक ८१ मध्ये जोडण्यात याव्यात! राजकीय हस्तक्षेपामुळे या गल्ल्या जोडण्यात आल्या असून, या भागात अनुसूचित जातीचे ९०  टक्के लोक राहतात, असे आक्षेपात नमूद केले आहे. 


सोडत, वॉर्ड रचनेवर २९ आक्षेप दाखल
महापालिका प्रशासनाने तयार केलेली वॉर्ड रचना, सोडतीवर औरंगाबादकर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. दोन दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे तब्बल २९ आक्षेप दाखल झाले आहेत. बुधवारी दिवसभरात सर्वाधिक २३ आक्षेप आले. ११ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आक्षेपांचा अक्षरश: महापूर येणार हे निश्चित. काही नगरसेवकांनी सोयीचा वॉर्ड तयार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याची चर्चाही आता मनपात जोर धरत आहे.
मंगळवारपासून महापालिकेच्या निवडणूक विभागात आक्षेप व हरकती स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ६ आक्षेप दाखल झाले होते. बुधवारी तब्बल २३ आक्षेप दाखल झाले. वॉर्ड रचना तयार करतानाच विशिष्ट लोकप्रतिनिधी डोळ्यासमोर ठेवून, पुढील महापौर आरक्षण लक्षात घेऊन सोय करण्यात आली आहे. सेना, भाजप, एमआयएम, काँग्रेस पक्षातील काही विद्यमान नगरसेवकांची खास काळजी घेतली आहे. महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांच्या फक्त २० नगरसेवकांसाठी पन्नास टक्क्यांहून अधिक वॉर्ड फोडण्यात आले आहेत.

आयोगाने ८५ सुधारणा कोणत्या केल्या
महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी राजकीय मंडळींची मर्जी राखण्यासाठी वॉर्ड रचना तयार केली. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यात तब्बल ८५ सुधारणा केल्याची माहिती समोर येत आहे. वॉर्ड रचना, आरक्षण सोडत अंगलट येऊ लागल्याने मनपा प्रशासन आम्ही काहीच केले नाही, सर्व काही आयोगाने केले असे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.

एस. टी. वॉर्डांचा तपशील
वॉर्ड    लोकसंख्या
०३-एकतानगर    ४५७
१३-रोजेबाग    ३३९
४९- नवाबपुरा    २०४
४६- नवाबपुरा     ४२५
       (जुना वॉर्ड

Web Title: big fraud in the municipal corporation's ST ward reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.