शिधापत्रिकांच्या नोंदीमध्ये मोठा गोंधळ
By Admin | Published: May 1, 2017 12:27 AM2017-05-01T00:27:06+5:302017-05-01T00:34:04+5:30
जालना :स्वस्तधान्य लाभार्थींच्या आॅनलाईन फिडींगच्या वेळी अनेक चुका झाल्या आहेत
जालना : जिल्हा पुरवठा विभागाने सर्व स्वस्तधान्य दुकानदारांना ईपॉस मशीनचे वितरण केले आहे. मात्र स्वस्तधान्य लाभार्थींच्या आॅनलाईन फिडींगच्या वेळी अनेक चुका झाल्या आहेत. त्यामुळे ईपॉस मशीनचा वापर करणे जिकिरीचे ठरत असून सदर मशीनच्या वापराबाबत जालना जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक महासंघाने चिंता व्यक्त केली आहे. या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका आॅनलाईन व आधार कार्डची संलग्न करण्याचे काम एका खाजगी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आॅनलाईन फिडिंगही करण्यत आली. मात्र ही नोंद करताना संबंधित एजन्सीने एकाच आधारक्रमांकावर हजारो व्यक्तींची नावे जोडली आहेत. सर्व कुटुंबाची शिधापत्रिका एकाच आधार क्रमांकावर नोंद केलेली आहे. यासोबतच एकाच शिधापत्रिकांची नोंद अनेक दुकानावर झालेली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेक त्रुटी आॅनलाईन नोंदणीच्या वेळी झालेल्या आहेत. कोणीही लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये असे आदेश असले तरी आॅनलाई धान्य कसे वाटप करायचे याबाबत काहीच खुलासा दिलेला नाही. स्वस्तधान्य दुकानदारांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात तीस हजार व्यक्तींच्या नावासमोर एकाच क्रमांकाचे आधार कार्ड जोडल्या गेलेले आहे. त्यामुळे ईपॉस च्या यादीत मोठा घोळ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे ईपॉसद्वारे चुकीच्या नोंदी ओळखणे अवघड असून, अशा काही अनियमितता घडल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊन दुकानदारांना कायदेशीर कारवाईस जाण्याची वेळ येऊ शकते. जालना शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये आजही अनेक लाभार्थी आॅनलाईन नोंदणीपासून वंचित आहेत.