मोठ्या मनाचे 'मामा'; 'त्या' गरीब कुटुंबाला ३५ किलो धान्य देऊन हवालदाराने जपली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 02:36 PM2021-05-14T14:36:05+5:302021-05-14T14:38:40+5:30
हवालदार प्रकाश भालेराव यांनी जवळच्या किराणा दुकानात जाऊन ३० किलो गहू आणि ५ किलो तांदूळ विकत घेऊन दिले.
औरंगाबाद : कामधंदा नसल्याने घरात धान्याचा कण नसल्याचे सांगणाऱ्या एका गरीब विधवा महिलेला पोलीस हवालदाराने तत्काळ स्वखर्चाने ३० किलो गहू आणि ५ किलो तांदूळ खरेदी करून देत माणुसकी जपली. तसेच १००० हजार रुपये खर्चाला देऊन महिलेची काळजी काही प्रमाणावर दूर केली आहे.
सिडको पोलीस ठाण्याचे हवालदार प्रकाश भालेराव बुधवारी सकाळपासून आंबेडकर चौकात नाकाबंदी करीत होते. तेव्हा एक महिला दोन मुली व एका लहान मुलासह तेथे आली. साहेब काही कामधंदा मिळेल का असे तिने त्यांना विचारले. काम मिळत नसल्यामुळे जवळ एक पैसाही नाही. यामुळे घरात धान्याचा कणही नसल्याचे सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू आले. हे पाहून हवालदार भालेराव यांनी त्या महिलेसह तिच्या बाळांना पाणी पिण्यास दिले आणि सावलीत बसविले. त्यांनी लगेच जवळच्या किराणा दुकानात जाऊन ३० किलो गहू आणि ५ किलो तांदूळ विकत घेऊन दिले.
महिला विधवा असून धुणीभांडी करते
महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. यामुळे ती धुणीभांडी करून तीन लेकरांचा सांभाळ करते. मात्र, लॉकडाऊन झाल्याने तीचे काम सुटले. उपासमार सुरु झाल्याने हिनानगर चिकलठाणा येथून काम शोधत तीनही मुलांसह महिला सिडकोच्या आंबेडकर नगर चौकात आली होती.