कोरोना लसीसाठी मोठी सुई, वेस्टेजमुळे पळता भुई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:02 AM2021-09-12T04:02:02+5:302021-09-12T04:02:02+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून होणारा एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला आहे. ही सिरिंज राज्यातही ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून होणारा एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला आहे. ही सिरिंज राज्यातही कुठे मिळत नाही. त्यामुळे नियमित लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या मापाच्या म्हणजे १ ते २ सीसी सिरिंज कोरोना लस देण्यासाठी वापरण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर ओढावली आहे; पण त्यातून लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण वाढत असल्याची चिंता आरोग्य यंत्रणेला सतावत आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीकरणासाठी केंद्राकडून एडी सिरिंजचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या काही दिवसांत या सिरिंजचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. सिरिंज संपल्याच्या तक्रारी लसीकरण केंद्रांवरून वाढल्या. त्यामुळे नियमित लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सिरिंज केंद्रांना वितरित करण्यात आल्या आहेत. मात्र, आता या नियमित सिरिंजच्या वापरातून डोस वाया जाण्याच्या समस्येला आरोग्य यंत्रणेला सामोरे जावे लागत आहे.
कोरोना प्रतिबंधक म्हणून आलेली कोव्हॅक्सिन लस वाया (वेस्ट) जाण्याचे प्रमाण ऑगस्टमध्ये राज्यात सर्वाधिक पुण्यात होते. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी असल्याचे समोर आले होते; परंतु सिरिंजच्या तुडवड्यामुळे आता डोस वाया जाण्यात जिल्ह्याचे नाव येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
-------
काय आहे एडी सिरिंज?
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र शासनामार्फत एडी सिरिंजचा पुरवठा केला जात आहे. लसीच्या कुपीतून (व्हायल) ०.५ एमएल डोस ओढल्यानंतर ही सिरिंज आपोओप लाॅक होते. त्यामुळे एका कुपीतून ११ ते १२ डोस होतात. एकदा डोस दिल्यानंतर ही सिरिंज पुन्हा वापरताही येत नाही. त्यामुळे ही सिरिंज नष्ट करावी लागते.
------
१ ते २ सीसी सिरिंज कशी असते?
एडी सिरिंज मिळतच नसल्याने आरोग्य यंत्रणा सध्या १ ते २ सीसी सिरिंज कोरोनाचा डोस देण्यासाठी वापरत आहे. १ ते २ सीसी सिरिंज म्हणजे डिस्पोजल सिरिंज होय. या सिरिंज सहजपणे बाजारातून उपलब्ध होतात.
---
अर्धा ते दीड मिली द्रावण वाया
एक सीसी म्हणजे एक एमएल होय. त्यामुळे १ ते २ सीसी सिरिंजमधून एडी सिरिंजपेक्षा डोस घेण्याचे माप अधिक आहे. त्यामुळे अर्धा एमएल ते दीड एमएल डोस वाया जाण्याची वेळ ओढावत आहे.
--
केंद्राने दिली परवानगी
एडी सिरिंजचा सध्या तुटवडा आहे. केंद्र सरकारने १ ते २ सीसी सिरिंज वापरण्याची परवानगी दिली आहे; परंतु त्याचे माप मोठे आहे. त्यामुळे डोस वाया जाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सिरिंज मिळत आहेत.
- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी