मोठी बातमी! 'टोयोटा'नंतर छत्रपती संभाजीनगरात लवकरच मोठ्या आयटी कंपनींची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 07:44 PM2024-08-06T19:44:28+5:302024-08-06T19:45:58+5:30

ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिकपट्ट्यात अमेरिकेची एक मोठी आय. टी. कंपनी येणार असल्याचे सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Big news! After 'Toyota' entry of big IT companies in Chhatrapati Sambhajinagar soon | मोठी बातमी! 'टोयोटा'नंतर छत्रपती संभाजीनगरात लवकरच मोठ्या आयटी कंपनींची एंट्री

मोठी बातमी! 'टोयोटा'नंतर छत्रपती संभाजीनगरात लवकरच मोठ्या आयटी कंपनींची एंट्री

छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी अथर एनर्जी, हायब्रीड कार निर्मिती क्षेत्रातील टाेयोटा, जेएसडब्ल्यू मोबिलिटी आणि वंगण निर्मिती क्षेत्रातील लुब्रिझोल आदी कंपन्यांनी ऑरिक सिटीच्या बिडकीन औद्योगिकपट्ट्यात उद्योग उभारण्याची घोषणा केली. या कंपन्यांपाठोपाठ आता ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिकपट्ट्यात अमेरिकेची एक मोठी आय. टी. कंपनी येणार असल्याचे सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या कंपनीमुळे सुमारे दाेन हजार तरुणांना थेट रोजगार मिळणार आहे.

सीएमआयएच्या नवनियुक्त कार्यकारिणीचे अध्यक्ष अर्पित सावे, सचिव अथर्वेशराज नंदावत, प्रशासन जनसंपर्कप्रमुख सौरभ छल्लानी, महिला उद्योजकता सेलप्रमुख उत्कर्षा पाटील, कार्यकारी सदस्य हर्षवर्धन जाजू, कार्यकारी सचिव रवींद्र मानवतकर, जनसंपर्कप्रमुख निखिल भालेराव यांनी सोमवारी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. या पदाधिकाऱ्यांनी संपादकीय मंडळाशी मनमोकळा संवाद साधला. अथर एनर्जी, टोयोट, जेएसडब्ल्यू आणि लुब्रिझोल या कंपन्यांना येथे आणण्यासाठी सीएमआयएचे पदाधिकारी मागील दीड वर्षापासून या कंपन्यांचे संचालक आणि शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत, असे सावे यांनी सांगितले.

टोयोटा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक त्याच्या प्रायव्हेट विमानाने शहरात आले होते. तेव्हा शहराचे तापमान ४० डिग्री होते. त्यांना बिडकीन येथील सेव्हन स्टार इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीयल झोन दाखविला. बिडकीन डीएमआयसीसोबतच येथील शाळा, कॉलेज, हॉटेल्स आणि आंतरराष्ट्रीय वारसास्थळांची माहिती दिली. यानंतर टोयोटाची सुमारे ३५ जणांची टीम येथे आली होती. या टीमलाही आम्ही संपूर्ण शहर आणि परिसर, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहत आणि ऑरिक सिटीची शेंद्रा, बिडकीन डीएमआयसी दाखविली. देशातील सर्वांत मोठी येथील सेव्हनस्टार औद्योगिक लॅण्ड बँक केवळ आपल्याकडे आहे. हे पाहून त्यांनी येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. हा उद्योग अन्य राज्यांत जाऊ नये, यासाठी राज्यकर्ते आणि आम्हाला गुप्तता पाळावी लागल्याचे सीएमआयएचे उपाध्यक्ष उत्सव माछर यांनी सांगितले. टोयोटा ८०० एकरांवर आपला प्रोजेक्ट उभारणार आहे. या कंपन्यांपाठोपाठ आता येथे आयटी कंपन्या येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शेंद्रा ऑरिक सिटीच्या इमारतीत अमेरिकन कंपनी पायलट तत्त्वावर कार्यरत आहे. या कंपनीने सध्या २०० जणांना रोजगार दिला आहे. लवकरच ही कंपनी विस्तार करणार आहे. यासाठी कंपनीने शेंद्रा येथे १० एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी तब्बल ९० विभागांत काम करणार आहे. या कंपनीमुळे दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे अर्पित सावे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस, सावे यांचा पुढाकार
गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची वेळोवेळी भेट घालून दिल्याने हे प्रकल्प अन्य शहरांऐवजी छत्रपती संभाजीनगरमध्ये खेचून आणता आल्याचे सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Big news! After 'Toyota' entry of big IT companies in Chhatrapati Sambhajinagar soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.