मोठी बातमी! मराठा समाज सर्वेक्षण २४ जानेवारीपासून, सॉफ्टवेअरचा वापर होणार
By विकास राऊत | Published: January 19, 2024 01:04 PM2024-01-19T13:04:55+5:302024-01-19T13:09:53+5:30
ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांची मदत घेतली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार असून, २० जानेवारीला मास्टर ट्रेनर्सला, तर २१ व २२ जानेवारीला तालुक्यातील ट्रेनर व प्रगणकांना तज्ज्ञ प्रशिक्षक सर्वेक्षण सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन वापराचे प्रशिक्षण देणार आहेत. संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणीच हे प्रशिक्षणवर्ग घेतले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते व उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती केली आहे. मास्टर ट्रेनर्सला गोखले इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. ५० कुटुंबांमागे एक प्रगणक याप्रमाणे सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांची नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे. सात दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रश्नावलीनुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सर्वेक्षणाच्या कामासाठी विभागीयस्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी महापालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी घोषित केले आहे. सर्वेक्षणासाठी पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट संस्थेने सॉफ्टवेअर तयार केले आहे.