मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा

By विकास राऊत | Published: March 16, 2023 07:01 PM2023-03-16T19:01:33+5:302023-03-16T19:02:04+5:30

मार्च महिन्यातच संप पुकारल्यामुळे महसूल कामकाजासह सर्व अंगीकृत कामांवर संपाचा परिणाम झाला आहे.

Big news! Notices to about 1.25 lakh striking employees in Marathwada | मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा

मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांंना शासनाच्या परिपत्रकानुसार शिस्तभंग व गैरवर्तणुकीची नोटीस बजावण्यात आली आहे. काम नाहीतर वेतनही नाही, या धोरणाचा अवलंब शासनाने केल्याचेही नोटीसमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे रोज १२ कोटी रूपये याप्रमाणे तीन दिवसांचे ३६ कोटींचे वेतन कपात होण्याची शक्यता आहे.

१४ मार्चपासून राज्यासह सर्व प्रशासकीय विभागातील २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांंनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपाची हाक दिली असून संपाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. मार्च महिन्यातच संप पुकारल्यामुळे महसूल कामकाजासह सर्व अंगीकृत कामांवर संपाचा परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४८ विभागांतील २३,६२२ पैकी ८,७२२ कर्मचारी संपात सहभागी आहेत. १४,५९६ कर्मचारी कामावर हजर असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूरमधील महापालिका वगळून सुमारे ८० हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी असल्याने सगळ्याच कामकाजावर परिणाम झाला.

शिस्तभंग, गैरवर्तणुकीसह वेतन कपातीचा उल्लेख
‘एकच मिशन - जुनी पेन्शन’ हा नारा देत मराठवाड्यासह राज्यातील शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आरोग्य आणि बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यांंना बजावलेल्या नोटीसमध्ये शिस्तभंग, गैरवर्तणुकीसह काम नाहीतर वेतन नाही, या धोरणाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

सामान्यांचा राबता झाला कमी
शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांचा राबता कमी झाला आहे. कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे सुनावण्या पुढे ढकलल्या आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ठप्प पडले आहेत. निराधार योजनेचा सेल बंद आहे. फेरफारची कामे, मुद्रांक नोंदणीसह टंचाई आराखड्याची कामे खोळंबली आहेत. सर्वात महत्त्वाचे करवसुली अभावी शासनाचा महसूल बुडण्याचे संकेत आहेत.

५४ हजार १७१ कर्मचारी संपात, ३२७० रजेवर
१ लाख १९ हजार २३ एकूण कर्मचारी आहेत. त्यापैकी ६१ हजार ५७७ कर्मचारी कार्यालयात हजर असल्याचा अहवाल शासनाला देण्यात आला आहे. मराठवाडा विभागातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपात सहभागी आहेत. ३२७० कर्मचारी रजेवर आहेत. ५१.७ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याचा दावा सामान्य प्रशासन उपायुक्तांनी केला आहे.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून विभागात सव्वालाख कर्मचारी संपावर आहेत.

संपात असलेल्या प्रत्येकांना नोटीस
मराठवाडा विभागातील जेवढे शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, त्या सर्वांना तेथील विभागप्रमुखांनी नोटिसा बजावल्या आहेत. आठही जिल्ह्यात संप सुरू असून शिस्तभंगाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
-पराग सोमण, विभागीय महसूल उपायुक्त

कार्यालय ठिकाणी------संपकऱ्यांची संख्या
विभागीय आयुक्तालय------२१
छत्रपती संभाजीनगर----७७३८
जालना-------४५३६
परभणी------५२५१
हिंगोली-----३९८२
नांदेड-----१०७६४
बीड-------७४३०
धाराशिव-----५६२३
लातूर-------७८२६
एकूण-----५४१७१

Web Title: Big news! Notices to about 1.25 lakh striking employees in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.