मोठी बातमी! वाळू तस्करास एक वर्षाची कैद; पैठण न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 01:21 PM2023-04-13T13:21:12+5:302023-04-13T13:21:50+5:30
पैठण न्यायालयाच्या निकालामुळे वाळू तस्करात मोठी खळबळ माजली असून सर्वसामान्य जनतेतून स्वागत करण्यात येत आहे.
पैठण (छत्रपती संभाजीनगर) : वाळू चोरी प्रकरणात तस्करास एक वर्षाचा तुरूंगवास व पाच हजार रू दंडांची शिक्षा पैठण न्यायालयाने सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बेफाम झाळेल्या वाळू तस्करांना निश्चितच चाप बसणार असून वाळू चोरीत शिक्षा होते याची जाणीव झाल्याने वाळू चोरांची हिंमत खचणार असल्याची चर्चा आहे.
वाळू चोरीच्या बाबतीत तुरूंवासाची शिक्षा देणारा निकाल या अगोदर देण्यात आलेला नसल्याने पैठण न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. केवळ आर्थिक दंड होत असल्यामुळे माफियांची हिंमत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. सध्यातर प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांच्यावर हल्ला करण्याईतपत वाळू माफियांची हिंमत वाढली आहे. दरम्यान, बाळासाहेब उत्तमराव मनोहर (५५, रा हर्सुली ता गंगापुर जि छत्रपती संभाजी नगर) या वाळू तस्करास पैठण न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. भावसार यांनी एक वर्षाच्या तुरंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
काय होते प्रकरण ?
बिडकीन पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते यांनी पेट्रोलिंग दरम्यान सन २०१४ मध्ये बाळासाहेब मनोहर याचा वाळूने भरलेला ट्रक ( एम एच १५- सीके २४४२) चितेगाव परिसरात पकडला होता. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन बाळासाहेब मनोहर याने ट्रक सोडून पळ काढला. या प्रकरणात तत्कालीन हवालदार प्रकाश शिंदे यांनी गुणवत्तापूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. सरकारी अभियोक्ता अनिल शिंपी यांनी या प्रकरणातील ४ साक्षिदारांच्या साक्ष नोंदवून आरोपी बाळासाहेब मनोहर याने वाळूचोरीचा गुन्हा केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी न्यायालयास या प्रकरणी प्रशासकीय मदत केली. साक्षीदारांची साक्ष व पुरावे लक्षात घेऊन पैठण न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. भावसार यांनी आरोपी बाळासाहेब मनोहर यास शिक्षा सुनावली. पैठण न्यायालयाच्या निकालामुळे वाळू तस्करात मोठी खळबळ माजली असून सर्वसामान्य जनतेतून स्वागत करण्यात येत आहे.