मोठी बातमी! ऑरिकच्या बिडकीन डीएमआयसीमध्ये 'अथर एनर्जी'चा १०० एकरावर ईव्ही प्रकल्प
By बापू सोळुंके | Published: June 18, 2024 02:14 PM2024-06-18T14:14:28+5:302024-06-18T14:15:02+5:30
सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन डीएमएआयसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिक दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित 'अथर एनर्जी कंपनी लवकरच ऑरिक सिटीच्या बिडकीन डीएमआयसीमध्ये १०० एकरावर आपला प्रकल्प उभारणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबतची नुसती घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येथे ही कंपनी करणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 'अथर' चा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये यावा, यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करीत असलेल्या उद्योगजगतामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित अथर एनर्जी हा ग्रुपने त्यांच्या महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प डीएमआयसीमध्ये उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. अथरचे अधिकारी जागेची पाहणी करून गेले होते. एवढेच नव्हे तर येथील सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली होती. अथर ग्रुपला ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील जमीन पसंत पडली होती. केंद्र सरकारनेही ईव्ही उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. सोबतच ईव्ही उद्योगांना विविध सवलतींची घोषणा केली आहे. राज्य सरकारनेही अथरने ऑरिक सिटीमध्ये प्रकल्प यावा, यासाठी संबंधित कंपनीकडे पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन डीएमएआयसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. अथर ग्रुप येथे त्यांच्या या प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सूत्राने दिली. या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार जणांना प्रत्यक्ष आणि १ हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याने उद्योगजगतात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सीएमआयएचा विशेष पाठपुरावा
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सुविधा असलेली लॅण्ड बँक ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये उपलब्ध आहे. यामुळे येथे मोठा अँकर प्रकल्प यावा यासाठी सीएमआयएचे पदाधिकारी दोन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत होते. सीएमआयएने एमजीएममध्ये आयोजित कॉन्फ्रन्ससाठी अथरचे सहसंस्थापक स्वप्निल जैन यांना आमंत्रित केले होते. एवढेच नव्हे तर येथील व्हेंडर साखळी अथरसाठी किती पूरक आहे, हे पटवूनही दिले होते. सीएमआयएने केेलेल्या प्रयत्नांना आता फळ आल्याची चर्चा आता उद्योगजगतात आहे.