मोठी बातमी! कचनेर जैन मंदिर चोरीप्रकरणात पोलिसांनी दोघांना मध्यप्रदेशातून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 11:07 AM2022-12-26T11:07:01+5:302022-12-26T11:07:35+5:30
मूर्ती चोरी प्रकरणातील संशयित हा चातुर्मासामध्ये कचनेर येथे तीन महिने वास्तव्यास होता.
औरंगाबाद : जैन धर्मीयांचे पवित्र स्थळ कचनेर (जि. औरंगाबाद) येथील चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथांची १ कोटी ५ लाखांची सोन्याची मूर्ती चोरी प्रकरणी दोघांना मध्यप्रदेश येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलीस तपासात मूर्ती चोरणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले. त्याच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांची दोन पथके मध्य प्रदेश, राज्यस्थानकडे रवाना झाली होती. चोरीची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला.
अशी उघडकीस आली चोरी
मंदिराच्या समितीचे महामंत्री विनोद लोहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार; भगवान पार्श्वनाथांची सोन्याची मूर्ती बदलल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त ललित पाटणी यांनी लोहाडे यांना शुक्रवारी (दि. २३) रात्री ९.३० वाजता दिली. त्यानुसार शनिवारी सकाळी १० वाजता मंदिराचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाने मूर्तीची पाहणी केली. तेव्हा मूर्तीमध्ये बदल जाणवला. बदललेल्या मूर्तीचे वजन केल्यानंतर ते ९४२ ग्रॅम भरले. प्रत्यक्षात सोन्याची मूर्ती २ किलो ५६ ग्रॅमची होती. त्यानंतर खासगी सुवर्णकार निलेश पाटणी यांच्याकडून मूर्तीची तपासणी केल्यानंतर बदललेली मूर्ती पितळेची असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, निरीक्षक देविदास गात, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्यासह इतरांनी मंदिराला भेट देत तपासाला सुरुवात केली.
सीसीटीव्हीत कैद झाला चोरटा
मंदिर परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर मंदिरातील एक शिष्य सुवर्ण मूर्ती ठेवलेल्या ठिकाणी हात घालून मूर्ती बाहेर काढताना सीसीटीव्हीत कैद झाला. मात्र, त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येत नाही. चोरीच्या घटनेपासून तो शिष्य गायब आहे. त्याचा मोबाइल नंबरही बंद येत आहे. त्याच्या शोधासाठीच पोलिसांची दोन पथके परराज्यात पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
१४ डिसेंबर रोजी चोरी
मंदिरातून सुवर्ण मूर्तीची चोरी १४ डिसेंबरच्या सकाळी ७ ते ९ या वेळेत झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी दिली. मंदिरात पूजा झाल्यानंतर त्याचे छायाचित्र दररोज व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाकले जाते. १३ डिसेंबरचे छायाचित्र आणि १४ डिसेंबरच्या छायाचित्रात मोठी तफावत आढळून आली. त्यानंतर मूर्तीचा रंग उडत गेल्यानंतर ती पितळेची असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. संशयित आरोपी सर्वांच्या ओळखीचा असून, त्यास पकडल्यानंतर घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
तीन महिने वास्तव्य
मूर्ती चोरी प्रकरणातील संशयित हा चातुर्मासामध्ये कचनेर येथे तीन महिने वास्तव्यास होता. त्यानंतर तो दि. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान कचनेर येथे आला, असे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पोहोचले. एका पथकाने मध्यप्रदेशातून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी मूर्तीची अदलाबदल केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत अधिक माहिती देणार आहेत.