मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, नव्या वादाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 05:10 PM2023-06-17T17:10:40+5:302023-06-17T17:11:14+5:30
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. सध्या औरंगाबादचे नामांतर, औरंगजेबाचे पोस्टर, स्टेटस ठेवल्यावरून राज्यभर वाद विवाद होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी येथे भेट दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात औरंगजेबावरून वाद पेटत आहेत. स्टेट्स, पोस्टरवरून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जावे, अशी मागणी केली होती. तर केंद्र सरकारने आधी या स्मारकाचा विशेष दर्जा काढून घ्यावा, असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाने दिलं होतं.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी सोबत राजकीय समझोता करण्याची तयारी दर्शविलेली आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे. भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट देखील यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
देशाला गुलाम केले त्यांची निंदा करा
खुलताबाद ऐतिहासिक शहर आहे, आम्ही येथील मारुती मंदिराला देखील भेटत आहोत. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे त्यांना एकच सांगतो, औरंगजेबाने राज्य केले हे कोणाला मिटवता येणार नाही. बाबासाहेबांनी सांगितले, औरंगजेबाचे राज्य आले जयचंद यांच्यामुळे आले. असे जयचंद येथील अनेक हिंदू राज्यांकडे होते. त्यांना तुम्ही का विरोध करत नाहीत. ज्यांनी देशाला गुलाम केले त्यांची तुम्ही निंदा करा.
- प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित बहुजन आघाडी