मोठी बातमी: पीएचडी करण्यासाठी विद्यार्थिनीला पैसे मागितले, अन् प्राध्यापिकेने गमावली नोकरी
By योगेश पायघन | Published: January 9, 2023 07:13 AM2023-01-09T07:13:19+5:302023-01-09T07:14:02+5:30
कुलगुरूंकडून कारवाई : उज्ज्वला भडंगे, नीरज साळुंखे यांना विद्यापीठ नोकरीतून काढले
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापिका संशोधक विद्यार्थिनीला प्रति विद्यार्थी २५ हजार आता आणि तेवढेच पैसे व्हायवाच्या वेळी गाईडला द्यावे लागतील, असे म्हणून, पैसे आणून देण्याची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप ३० मार्च २०२२ रोजी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात नेमलेल्या द्विसदस्सीय समितीच्या चाैकशीने सहयोगी प्राध्यापिका डॉ. उज्ज्वला भडंगे यांच्यावर गैरवर्तन करून शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवल्याने त्यांना विद्यापीठ सेवेतून काढण्याचा निर्णय कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी घेतला.
कुलगुरूंनी तीन प्राध्यापकांच्या संदर्भात चाैकशी समितीचे अहवाल आल्यावर त्यावर निर्णय घेतले. त्यात दोन प्राध्यापकांवर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने नोकरीवरून काढून टाकले. एका प्राध्यापकाला क्लीन चिट दिल्याने त्या प्राध्यापकाला सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यात आले. विद्यापीठ निधीतून सहयोगी प्राध्यापक असलेल्या डाॅ. भडंगे यांची ऑडिओ क्लिपच्या संभाषणाची क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागली होती. या प्रकाराला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. चौकशीसाठी अधिष्ठाता डाॅ. भालचंद्र वायकर आणि डाॅ. अंजली राजभोज यांच्या द्विसदस्सीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने अहवाल दिला. त्यावरून कुलगुरूंच्या आदेशाने सेवेतून कमी केल्याचे आदेश कुलसचिवांनी दिले.
इतिहास विभागात सहयोगी प्राध्यापक नीरज साळुंखे यांच्यावर निवृत्त न्या. ए. टी. ए. के. शेख यांच्या चौकशी समितीने गैरवर्तन करून शिस्तभंग केल्याचा अहवाल कुलगुरूंना दिला. कुलगुरूंनी सोळुंखे यांना सेवेतून काढण्याचा निर्णय घेतल्याने कुलसचिवांनी तसे आदेश काढले. पर्यावरणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. बलभीम चव्हाण यांचा सकारात्मक अहवाल असल्याने त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आल्याची माहिती कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी दिली.
काय आहे प्रकरण ?
पीएच.डी.चे रजिस्ट्रेशन झाल्यावर २५ हजार, व्हायवाच्या वेळी आणखी २५ हजार द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. तत्कालीन शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डाॅ. उज्ज्वला भडंगे या गाईड नसताना त्यांना पैसे का द्यावे, असे म्हणत त्यांच्याबद्दल संशोधक विद्यार्थिनी अंजली घनबहादूर यांनी कुलगुरूंकडे तक्रार दिली होती. तसेच शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखाकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे ५० हजारांची लाच मागण्यात आली. या प्रकरणात विद्यार्थिनीने विद्यार्थी संघटनांना सोबत घेऊन बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.