मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या शाळांची होणार गुणवत्ता तपासणी

By राम शिनगारे | Published: July 4, 2024 06:03 PM2024-07-04T18:03:28+5:302024-07-04T18:05:05+5:30

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय : केंद्रनिहाय पथकांची होणार स्थापना

Big news! There will be a quality inspection of Zilla Parishad schools | मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या शाळांची होणार गुणवत्ता तपासणी

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या शाळांची होणार गुणवत्ता तपासणी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात ८ जुलैपासून केंद्रनिहाय शाळांची गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

मागील शैक्षणिक वर्ष संपताना जि.प.चे सीईओ विकास मीना यांनी काही शाळांची गुणवत्ता तपासणी केली होती. त्या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांकडे पर्याप्त गुणवत्ता नसल्यामुळे एका शिक्षकाचेही निलंबन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी केलेल्या कारवाईमुळे हा विषय चर्चेचा बनला होता. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन २० दिवसांचाच अवधी उलटला असतानाच, सीईओंनी शाळांची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पथकांची स्थापना केली जाणार आहे. हे पथक एका केंद्रातील दहा ते बारा शाळांची तपासणी करतील. त्यातील ज्या शाळांमध्ये गुणवत्ता उच्च दर्जांची असेल, त्या शाळांतील शिक्षकांचा सन्मानही केला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

अशी असणार तपासणी
शाळेची तपासणी करण्यासाठी नेमलेले पथक पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना १ ते १०० चे आकडे येतात का, ते पाहतील, तसेच त्या वर्गातील विद्यार्थ्यांना जोडाक्षरे वाचता येतात का? दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना १० पर्यंतचे पाढे येतात का? अशा पद्धतीने गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे.

दर शनिवारी पेपर लिहिण्याचा सराव
जि.प.च्या आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सराव होण्यासाठी प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी पेपर देण्यात येणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे परीक्षेतील लिहिण्याची स्पीड वाढण्यासह आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. हा उपक्रम दप्तरमुक्त शाळांतर्गत राबविण्यात येणार असल्याचेही शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Big news! There will be a quality inspection of Zilla Parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.