मोठा दिलासा! हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र पूर्णत्वाकडे, दररोज ४ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार
By मुजीब देवणीकर | Published: December 1, 2023 07:02 PM2023-12-01T19:02:41+5:302023-12-01T19:03:14+5:30
हर्सूलच्या पाण्यावर जुन्या शहरातील १४ वॉर्डांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची तहान भागविली जाते.
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलावातून सध्या दररोज पाच ते सहा एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. वाढीव पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शुद्धीकरण केंद्र नाही. जटवाडा रोडवर जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूला नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, डिसेंबरअखेर काम पूर्ण होईल. नवीन वर्षात तलावातून दररोज किमान १० एमएलडी पाण्याची उचल मनपाला करता येणार आहे.
हर्सूलच्या पाण्यावर जुन्या शहरातील १४ वॉर्डांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची तहान भागविली जाते. अतिरिक्त पाण्याची गरज भासू लागल्याने नवीन यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात पाच ते सहा एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. याच ठिकाणी ४५ लाख रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्याचे काम आठ महिन्यांपूर्वी सुरू केले. कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले की, डिसेंबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर १ जानेवारीपासून जलशुद्धीकरण केंद्रात तलावात प्रक्रिया केली जाणार आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम झाल्यावर चार ते पाच एमएलडी अतिरिक्त पाणी शहराला मिळेल.