मोठा दिलासा! यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्यातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:00 IST2025-03-17T11:55:05+5:302025-03-17T12:00:02+5:30
जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत १६ मार्च रोजी ५८ टक्के जलसाठा शिल्लक होता. गतवर्षी १६ मार्चला केवळ २५ टक्के जलसाठा होता.

मोठा दिलासा! यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्यातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत १६ मार्च रोजी ५८ टक्के जलसाठा शिल्लक होता. गतवर्षी १६ मार्चला केवळ २५ टक्के जलसाठा होता.
मध्यम प्रकल्पात आजचा जलसाठा ४५ टक्के, तर लघु प्रकल्पात ३३ टक्केच उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. मराठवाड्यात जायकवाडी प्रकल्पासह ४४ मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा एकूण जलसाठा क्षमता ५ हजार ९३८ द.ल.घ.मी. आहे. रविवारी मराठवाड्यातील या प्रकल्पांमध्ये २ हजार ६४५ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. एकूण क्षमतेच्या ५८ टक्के हा साठा आहे. गतवर्षी मात्र मराठवाड्यात भयंकर परिस्थिती होती. गतवर्षी मोठ्या प्रकल्पांत केवळ २५ टक्केच जलसाठा उरलेला होता. मोठ्या धरणांप्रमाणेच मध्यम प्रकल्पांची स्थिती असल्याचे दिसून येते. मराठवाड्यात ८१ मध्यम प्रकारची धरणे आहेत. या धरणांची क्षमता १२२५ द.ल.घ.मी. आहे. या धरणांत आज ४७८ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. प्रकल्पीय क्षमतेच्या हा साठा ४५ टक्के असल्याचे दिसून येते. गतवर्षी मात्र मध्यम प्रकल्पांत या तारखेस
केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
लघु प्रकल्पांची अवस्था गतवर्षीपेक्षा बरी आहे. मराठवाड्यातील ७९५ लघु प्रकल्पांंची पाणी साठवणूक क्षमता १९३१ द.ल.घ.मी. आहे. आता मात्र या प्रकल्पांत केवळ ५६६द.ल.घ.मी.जलसाठा उरला आहे. एकूण क्षमतेच्या केवळ ३३ टक्के पाणी असल्याचे जलसंपदाकडून सांगण्यात आले. गतवर्षी लघु प्रकल्पांत केवळ १८ टक्केच जलसाठा होता.
प्रकल्प संख्या- आजचा जलसाठा - गतवर्षीचा जलसाठा
४४ ----५८%------- २५
मध्यम प्रकल्प-आजचा जलसाठा-- गतवर्षीचा जलसाठा
८१---------४५%----------२१%
लघु प्रकल्प-- आजचा जलसाठा-- गतवर्षीची टक्केवारी
७९५------------३३%------१८%