‘एकता दौड’ला जालनेकरांचा मोठा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:23 PM2017-10-31T23:23:45+5:302017-10-31T23:24:45+5:30
सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात मंगळवारी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
जालना : सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात मंगळवारी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मस्तगड येथे सरदार वल्लभभाई पटेल तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
याप्रसंगी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसीलदार बिपीन पाटील, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, आदींनी वल्लभभाई पटेल तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला. पालकमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
मस्तगड येथून सुरु झालेली ही रॅली मम्मादेवी, सुभाषचंद्र बोस पुतळा, पाणीवेस, काद्राबादमार्गे शिवाजी पुतळा येथे विसर्जित करण्यात आली. या दौडमध्ये जि. प. प्रशाला (मुलांची), इंडस बालकामगार प्रकल्पचे विद्यार्थी, आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूल, पोतदार इंग्लिश स्कूल, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, स्काऊट गाईड, गोल्डन ज्युबिली स्कूल, नर्सिंगचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, एसआरपीएफचे जवान यांच्यासह रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. नर्सिंग तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी रन फॉर युनिटी, अनेकता मे एकता, यही भारत की विशेषता, भारत देश है मेरी शान इसकी भाषा है महान, असा मजकूर असलेले फलक हाती घेऊन एकतेसंदर्भात जनजागृती केली.