जायकवाडीच्या पायथ्याशी पकडली महाकाय मगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:40 AM2017-11-09T00:40:13+5:302017-11-09T00:41:06+5:30
जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कावसान गावाच्या परिसरात बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास महाकाय मगर चक्क रस्त्यावरून जात असल्याचे काही मोटारसायकलस्वारांना दिसल्याने परिसरात मोठी घबराट पसरली.
पैठण : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कावसान गावाच्या परिसरात बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास महाकाय मगर चक्क रस्त्यावरून जात असल्याचे काही मोटारसायकलस्वारांना दिसल्याने परिसरात मोठी घबराट पसरली. मगर निघाल्याची बातमी पैठण येथील सर्पमित्र दिलीप सोनटक्के व राजू गायकवाड यांना देण्यात आली. या तरूणांनी तातडीने मगर जेरबंद करून ती वनखात्याच्या हवाली केली.
दक्षिण जायकवाडी रोडवरील कावसान गावाजवळ पकडण्यात आलेली मगर ८ फूट लांबीची व दीडफूट रूंद असल्याचे दिलीप सोनटक्के यांनी सांगितले. मगर पकडण्यासाठी दिलीप सोनटक्के यांना साहेबा ढवळे, राजू करवंदे, शरद शिंदे, राजू गायकवाड, जितेंद्र अटक, स्वप्नील साळवे, गणेश पातकळ, विष्णू जगताप, आशिष मापारी, आतिष गायकवाड, जालिंदर अडसूळ आदी तरूणांनी मदत केली.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे वनखात्याने पकडलेली मगर १७ सप्टेंबर २०१५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जायकवाडी प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता वन अधिकाºयांनी औरंगाबाद -जालना व पैठण शहराला पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी धरणाच्या अॅप्रोच कॅनॉलमध्ये आणून सोडली होती. पूर्ण वाढ झालेली ही महाकाय मगर येथे सोडण्यात आल्याने या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मगर पकडून ती समुद्रात सोडण्यात यावी, असे पत्र जायकवाडी प्रशासनाने वन विभागास दिले होते. औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनीही मगर धरणातून काढून समुद्रात सोडा असे आदेश दिले होते. परंतु वनखात्याने या बाबीस गांभीर्याने घेतलेच नाही. यानंतर वारंवार या मगरीने जायकवाडीच्या जलाशयात आपले दर्शन दिले. यामुळे धरण परिसरात काम करणाºया कर्मचाºयांत मोठी घबराट पसरली होती.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून जलाशयात मगर दिसलीच नव्हती. यामुळे सदरील मगर जलाशयाच्या विस्तीर्ण पानपसा-यात कोठेतरी लांब निघून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु आज या मगरीचे चक्क रस्त्यावर दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकात मोठे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
आता धरणात सोडू नका पूर्व परवानगी व सल्लामसलत न करता वनविभागाने नको त्या ठिकाणी मगर सोडल्याने जायकवाडी प्रशासनाने मोठी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे जायकवाडी प्रशासनाने तक्रार केली होती. आता धरणाबाहेर सापडलेली मगर जायकवाडी धरणात न सोडता ती समुद्रात सोडावी, अशी मागणी पैठणकरांनी केली आहे. मगर केली वनखात्याच्या हवाली पकडलेली मगर रिक्षात घालून युवकांनी वनखात्याच्या कार्यालयात आणून तिला बुधरात्री रात्री १२ वाजेच्या सुमारास वनविभागाचे तालुका प्रमुख संजय भिसे यांच्या हवाली केले.
दरम्यान, याबाबत आपण वरिष्ठ अधिका-यांना याबाबत कल्पना दिली असल्याचे भिसे यांनी सांगून वरिष्ठ अधिकारी पैठणकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले.