मराठवाड्यातील सर्वांत मोठा जनावरांचा आठवडी बाजार बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:12+5:302021-09-03T04:05:12+5:30
ग्रामपंचायत, व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी : पशुपालकांची शोधाशोध फुलंब्री : तालुक्यातील वडोदबाजार येथे मराठवाड्यातील सर्वांत मोठा भरणारा जनावरांचा आठवडी ...
ग्रामपंचायत, व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी : पशुपालकांची शोधाशोध
फुलंब्री : तालुक्यातील वडोदबाजार येथे मराठवाड्यातील सर्वांत मोठा भरणारा जनावरांचा आठवडी बाजार गेल्या वर्षभरापासून बंद पडल्याने व्यापारी व ग्रामपंचायत प्रशासनाला आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलजोडी शोधण्याकरिता गावोगावी फिरण्याची वेळ आली आहे. वडोदबाजार येथील आठवडी बाजार कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद पडल्याने यांचा मोठा परिणाम शेतकरी, जनावरांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी, ग्रामपंचायत तसेच स्थानिक छोटेखानी व्यवसाय करणाऱ्यांवर झाला आहे.
---
मराठवाड्यात पहिला बाजार
प्रत्येक सोमवारी भरणाऱ्या वडोदबाजारमध्ये केवळ राज्यातीलच नव्हे, तर मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यातील मोठे व्यापारी येथे दाखल होतात. एका आठवडी बाजारातून किमान एक कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. शेळी, मेंढींची मोठ्या प्रमाणात खरेदी, विक्री या ठिकाणी होते, तर बैल, गाय, म्हैस खरेदीसाठी व्यापाऱ्यांची, शेतकऱ्यांची झुंबड असते. पण अशा परिस्थितीत शुकशुकाट पाहायला मिळते. बंदचा परिणाम परिसरातील गावांवरही विविध कारणास्तव झालेला दिसून येतो.
---
आर्थिक कोंडीचा करावा लागतो सामना
वडोदबाजार येथे जनावरांच्या बाजारासोबत इतर सर्व प्रकारच्या वस्तूंच्या दुकाने लागतात. या बाजारापासून ग्रामपंचायतीला एका वर्षभरात ५० ते ६० लाखांचे उत्पन्न मिळते; पण हे उत्पन्न एका वर्षापासून मिळालेच नाही. परिणामी गावातील विकासकामांवर परिणाम झाला. तसेच ग्रामपंचायतीमधील कर्मचारी यांचा पगार देण्याचेही वांदे झालेले आहे. याला लागून असलेले व्यापारीही हवालदील झालेले आहेत. बैल, म्हैस, शेळी, मेंढी विक्री थांबली आहे. त्याचे येणारे उत्पन्न थांबले. बाजाराचा लिलाव घेणारे ठेकेदारही बेरोजगार झाले. हे सर्व एका कोरोना रोगाने केले.
---
आठवडी बाजार सुरू असताना प्रत्येक बाजारात किमान दोन किवा तीन जनावरे विक्री व खरेदी करीत होतो. यातून मला बऱ्यापैकी आर्थिक लाभ होत होता; पण गेल्या एका वर्षांपासून ही कमाई पूर्णपणे बंद झाली. आर्थिक फटका बसला. - संतोष कडुबा तुपे, व्यापारी.
---
जनावरांचा बाजार एका वर्षापासून बंद पडला. शेतकरी अडचणीत सापडला. दरवर्षी आम्ही नवे-जुने करून बैलजोडीची खरेदी, विक्री करीत होतो. पण, हे करता आले नाही. बाजार सुरू होता. तेव्हा बैल विक्री केले. पण बंद पडल्याने अद्यापही बैल मिळालाच नाही. परिणामी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली. - राजू म्हस्के, शेतकरी.