बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्धचा तक्रार अर्ज महिनाभरापासून ठाण्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 06:45 PM2019-04-01T18:45:36+5:302019-04-01T18:47:47+5:30

पोलिसांची कारवाई करण्यासाठी टाळाटाळ 

The biggest complaint filed against the employee in Thane | बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्धचा तक्रार अर्ज महिनाभरापासून ठाण्यात पडून

बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्धचा तक्रार अर्ज महिनाभरापासून ठाण्यात पडून

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियानातील घोटाळेबाज कर्मचाऱ्यांना अभयडॉ. अमोल गिते यांना निधीचा घोळ निदर्शनास आला.

औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) निधी घोटाळ्यातील बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी क्रांतीचौक पोलिसांना तब्बल महिनाभरापासून सवड मिळालेली नाही.

जिल्हा परिषद आरोग्य विभागात ‘एनएचएम’मध्ये तत्कालीन कंत्राटी लेखापाल अजय पेरकर याने बँकेतील योजनांचा निधी टप्प्याटप्प्याने स्वत:च्या खात्यावर वळविला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी या विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर निधीचा घोळ त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना सांगितली. पवनीत कौर यांनी ‘एनएचएम’ अंतर्गत निधीच्या अपहाराचा प्रकार मुंबई येथील आरोग्य विभागाच्या आयुक्तांना सांगितला. आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादला पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तब्बल १८ लाख १६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल चौकशी पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला. 

दरम्यान, २८ जानेवारी रोजी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप प्रशासनावर केला. तेव्हा यासंदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने सभागृहात दिले होते. आरोग्य आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर जि. प. प्रशासनाने जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर या दोन्ही बडतर्फ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यांच्याकडून खुलासेही प्राप्त झाले. 
तत्पूर्वी, कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड यांना वेतन व भत्त्यापोटी २ लाख ३० हजार रुपये देणे होते; परंतु त्यांच्या बँक खात्यावर २३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. नंतर ती रक्कमही बनसोड यांनी ‘एनएचएम’च्या खात्यावर परत जमा केली. 
या प्रकरणात कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर यांना जबाबदार धरून जिल्हा परिषदेने त्यांना सेवेतून बडतर्फ केले. अलीकडे १८ लाखांच्या या अपहारामध्ये कविता बनसोड यांचा सहभाग नसल्यामुळे विधि सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार जि. प. आरोग्य विभागाने अजय पेरकरविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. परंतु महिनाभराचा कालावधी लोटला, तरी अजूनही पोलिसांनी दोषीविरुद्ध कारवाई केलेली नाही.
आता आरोग्य विभाग झाला सतर्क
जालना रोडवरील एका बँकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे खाते आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निधीची जमा किंवा काढण्यात येणाऱ्या रकमेचे अधिकार आहेत.मात्र, बँकेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर नोंद नसल्यामुळे रकमा जमा केल्या अथवा काढण्यात आल्याचा ‘एसएमएस’ येत नव्हता. आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी बँकेत आपला मोबाईल नंबर नोंद केला आहे. त्यामुळे बँकेतील व्यवहाराचे नियमित ‘एसएमएस’ येत असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. पूर्वी ‘एसएमएस’ येत नसल्यामुळे सलग तीन वेळा निधीचा अपहार झाला. आता यापुढे अशा अपहारास पायबंद बसेल, असे डॉ. गिते म्हणाले.

Web Title: The biggest complaint filed against the employee in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.