लेबर कॉलनीची जागा ताब्यात घेणे हा सर्वात मोठा संकल्प : सुनील चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 01:45 PM2022-01-01T13:45:28+5:302022-01-01T13:50:02+5:30
नववर्षात प्रशासन काय करणार : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा प्लान
औरंगाबाद : लेबर कॉलनीतील साडेतेरा एकर जागा ताब्यात घेऊन तेथे प्रशासकीय संकुल बांधण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करणे, हाच सर्वात मोठा नववर्ष संकल्प असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. लेबर कॉलनी हाच ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो कायदेशीररीत्या राबविण्यात येईल.
सरत्या वर्षात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत विकासकामे होतील, या दिशेनेही प्रयत्न केले. एनएच २११ महामार्ग सुरू होणे, समृद्धीचे काम अंतिम टप्प्यात येणे, घाटीतील आरोग्य सुविधांसाठी शासकीय मदत घेऊन नवनिर्माण करण्यासह बीड बायपासच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. कलेक्टर वॉल, कार्यालयाचे सुशोभीकरणासारखे उपक्रम राबविले. सिटी वॉलचे काम नवीन वर्षात सुरू होईल, असे सांगून नवीन वर्षात हायस्पीड रेल्वेच्या सर्वेक्षणाला सुरुवात होईल. त्यासाठी पूर्ण क्षमतेने काम होईल, असे प्रशासनाचे प्रयत्न असतील. विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाचे काम नवीन वर्षात मार्गी लागेल.
नव्या वर्षात रेल्वेसाठी वेगाने पाठपुरावा करण्यात येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे रेल्वेची सर्व प्रस्तावित कामे करण्यात येतील. औरंगाबाद ते फर्दापूर हा रस्ता पूर्ण होईल. वैजापुरात सोलार प्रकल्पाला जागा दिली असून तो पूर्णत्वास जाईल. समृद्धी महामार्गाचा जिल्ह्यातील टप्पा पूर्ण होत आला आहे. जिल्हाधिकारी म्हणून ज्या प्रकल्पांना सहकार्य करायची गरज असेल, त्यासाठी पूर्ण क्षमतेने सहकार्य करण्याचा संकल्प नवीन वर्षात असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.