लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका टेलरिंग व्यवसायाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:02 AM2021-04-25T04:02:01+5:302021-04-25T04:02:01+5:30

औरंगाबाद : मुस्लीम बांधव ज्या पद्धतीने रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात तशीच अवस्था शहरातील प्रत्येक टेलर बांधवांची असायची. ...

The biggest hit of the lockdown was on the tailoring business | लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका टेलरिंग व्यवसायाला

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका टेलरिंग व्यवसायाला

googlenewsNext

औरंगाबाद : मुस्लीम बांधव ज्या पद्धतीने रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात तशीच अवस्था शहरातील प्रत्येक टेलर बांधवांची असायची. रमजान ईदला नागरिक मोठ्या प्रमाणात कपडे शिवून घेत असत. मागीलवर्षी कडक लॉकडाऊनमुळे सिझन गेला. यावर्षीही तशीच अवस्था आहे. आम्ही आमच्या कारागिरांनी जगायचे तरी कसे? असा प्रश्न टेलरिंग व्यावसायिकांना पडला आहे.

शहरात तीन हजारांहून अधिक टेलर आहेत. रेडिमेट कपड्याच्या जमान्यात त्यांनी आपले महत्त्व आजही टिकवून ठेवले आहे. रमजान दिवाळी-दसरा यांसारख्या मोठ्या सणांना नागरिक नवीन कपडे शिवून घेतात. रमजान महिन्यात टेलर बांधवांना जराशीही उसंत मिळत नव्हती. रमजान सुरू होण्यापूर्वीच तर काहीजण दहा रोजे झाल्यानंतर बुकिंग बंद करून टाकत होते. एका टेलरकडे किमान ७०० ते २००० नागरिकांच्या कपड्यांचे बुकिंग असायचे. विशेष बाब म्हणजे ईदच्या अगोदर सर्वांना कपडे देणे गरजेचे असते. टेलर बांधवांसाठी रमजान ईद काळात सर्वात मोठी कमाई व्हायची. मागील वर्षी दुकाने बंद होती. कारागिरांना कसेबसे सांभाळले. यावर्षी परत तीच अवस्था निर्माण झाली. कारागिरांना सांभाळणे अवघड झाले त्यामुळे अनेकांनी त्यांना गावाकडे पाठवून दिले. दरवर्षी गरिबातील गरीब नागरिक ईदला नवीन कपडे घेतो. यावर्षीही मुस्लीम बांधव जुन्या कपड्यांवरच ईद साजरी करणार हे निश्चित. अशा परिस्थितीत जगायचे तरी कसे? असा प्रश्न शहरातील टेलर बांधवांना पडला आहे.

कारागिरांना अजूनही सांभाळतोय

मागील तेरा महिन्यांपासून अत्यंत वाईट परिस्थितीतून आम्ही जात आहोत. कारागीर असेल तर आम्ही व्यवसायात जिवंत राहू शकतो. ते नसतील तर हा व्यवसाय तुटल्यासारखा होतो. मागील काही दिवसांपासून त्यांना घरीच थांबून पगार देणे सुरू आहे. दरवर्षी रमजान ईदसाठी किमान ७०० नागरिकांचे कपडे मी शिवून देत होतो. लॉकडाऊनमुळे परिस्थिती विदारक बनली आहे.

सय्यद अब्दुल मुखीद, काली टेलर, बुढ्ढीलेन

महिनाभरात दोन हजार ड्रेस

कपडे शिवून घालणारा एक मोठा वर्ग आजही शहरात आहे. रमजान ईदला किमान दोन हजार ड्रेस आम्हाला शिवून देणे क्रमप्राप्त असते. १० रोजे झाल्यानंतर आम्ही बुकिंग बंद करतो. मागील वर्षी आणि यंदाही काम करता आले नाही. कारागिरांना गावाकडे पाठवून दिले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून टेलर बांधव जात आहेत.

शहारेख नवाब, नवाब टेलर, सिटीचौक

Web Title: The biggest hit of the lockdown was on the tailoring business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.