वाळूज येथून दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:02 AM2021-01-09T04:02:56+5:302021-01-09T04:02:56+5:30
वाळूज महानगर : वाळूज येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
वाळूज महानगर : वाळूज येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निसार हमीद पठाण (रा.लांझीरोड, वाळूज) यांनी बुधवार (दि.६) रात्री घरासमोर दुचाकी ( एम.एच.२०, एफ.बी.९१०१) उभी केली होती. चोरट्याने निसार पठाण यांची दुचाकी चोरुन नेली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
रांजणगावातून युवती बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून १८ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या बहिणीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. चांदणी सरफुद्दीन खान ही गुरुवार (दि.७ ) मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली आहे. पहाटे चांदणी ही बेपत्ता झाल्याचे उघड होताच नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही मिळून न आल्याचे बेपत्ता तरुणीची बहीण शबनम यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या बेपत्ता तरुणीचा शोध पोहेकॉ सुखदेव भागडे हे घेत आहेत.
--------------------------
महिलेची छेड काढणाऱ्याविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : नायगाव-बकवालनगर परिसरात ३० वर्षीय महिलेची छेड काढणाऱ्या अनिल कीर्तीशाही याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला बुधवारी घराच्या पाठीमागे तोंड धूत असताना आरोपी अनिल याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी अनिल कीर्तीशाही याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------
कमळापूररोडवर दारू विक्री करणाऱ्यास पकडले
वाळूज महानगर : कमळापूररोडवर अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुरुवार (दि.७) रात्री ८ वाजेच्या सुमारास पकडले. या रोडवरील साक्षी लॉन्सजवळ एकजण दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने छापा मारुन सोमनाथ दिनकर सिरसाठ (रा.रांजणगाव) यास पकडले. आरोपी सिरसाठ याच्या ताब्यातून देशी दारूच्या २१ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
---------------------------
वाळूज महानगरात पावसाची हजेरी
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात आज शुक्रवार (दि.८) सकाळी ९ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या परिसरात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आकाशात ढग दाटून येत आहे. शुक्रवारी सकाळपासून या परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना रेनकोट व छत्र्याचा आधार घ्यावा लागला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकावर विपरित परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांतून वर्तविली जात आहे.
--------------------------------