छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:56 IST2025-03-07T12:55:22+5:302025-03-07T12:56:17+5:30
महिला पोलिसांच्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट पाहून त्यांच्यावर वरिष्ठांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.

छत्रपती संभाजीनगरात महिला पोलिसांच्या रॅलीतच फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, जागीच दंड
छत्रपती संभाजीनगर : महिला दिन तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहर व ग्रामीण पोलिसांच्यावतीने गुरुवारी (दि. ६) महिला पोलिसांच्या रॅलीचे आयोजन केले होते. महिला पोलिसांच्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट पाहून त्यांच्यावर वरिष्ठांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाला ६ मार्च रोजी १० वर्षे पूर्ण झाले. तसेच, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. या निमित्ताने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. पोलिस आयुक्त कार्यालयातून सुरू झालेली रॅली मिल कॉर्नर, बाबा पेट्रोल पंप चौक मार्गे जालना रोडवरून चिश्तिया चौक, बजरंग चौक अधीक्षक कार्यालयात समारोप करण्यात आला.
नेतृत्व केलेल्या बुलेटवरच दंड
ग्रामीणच्या सहायक पोलीस आयुक्त आरती जाधव आणि शहरातील दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. त्यात जाधव यांच्या बुलेटच्या समोरील नंबर प्लेटवर ‘आबासाहेब’, तर मिरधे यांच्याकडील बुलेटचा नंबर नियमबाह्य लिहिलेला होता. वरिष्ठांच्या सूचनेनंतर दोघींनाही प्रत्येकी ५०० रुपयांच्या दंडाची पावती देऊन जागेवरच हा दंड वसूल करण्यात आला.