बिलावल भुत्तो यांना कोरोना विषाणूचा संसर्ग
By | Published: November 28, 2020 04:04 AM2020-11-28T04:04:39+5:302020-11-28T04:04:39+5:30
त्यांच्या राजकीय सचिवांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी बुधवारीच राजकीय घडामोडींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित ...
त्यांच्या राजकीय सचिवांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी बुधवारीच राजकीय घडामोडींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज श्रीलंका दौऱ्यावर
कोलंबो : सागरी सुरक्षा विभागीय उच्चस्तरीय चर्चेसाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे श्रीलंकेत आगमन होत आहे, असे श्रीलंकन लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सागरी सुरक्षा सहकार्यावर त्रिस्तरीय बैठकीचे श्रीलंका चौथ्यांदा यजमानपद भूषवत आहे. श्रीलंका भेटीत डोवाल श्रीलंकेचे संरक्षण सचिव कमल गुणरत्ने यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात आठ ठार
दिब्रुगड/तेजपूर : आसाममधील दिब्रुगड आणि सोनितपूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ जण ठार झाले. दिब्रुगड जिल्ह्यातील भोगामूर येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर अन्य दोन जखमी झाले. जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सोनितपूर जिल्ह्यातील गजेंगगुरी येथे झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.
मध्य प्रदेशात राहत्या घरात आढळले तीन मृतदेह
रतलाम : मध्य प्रदेशातील रतलम येथे एक जोडपे आणि त्यांची मुलगी राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. राजीवनगर परिसरातील एका इमारतीत पहिल्या मजल्यावर गोविंद सोलंकी, त्यांची पत्नी शारदा आणि मुलगी दिव्यासह राहत होते. बुधवारी रात्री फटाक्यांच्या आवाजात अज्ञात आरोपींनी त्यांना गोळ्या घातल्या, असा पोलिसांचा कयास आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
वीज खंडित केल्याने संतप्त लोकांनी ठोकले टाळे
लखनौ : घरांचा वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या लोकांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकले. कार्यालयाजवळील परिसरात कार्यालयाचे काही माजी कर्मचारी नातेवाईकांसह अवैधपणे राहत होते. त्यांनी कार्यालयातून अवैधपणे वीज घेतली होती. कार्यालयाच्या प्रभारीने सांगितले की, कार्यालयाला टाळे लावल्याचे कळल्यानंतर त्यांना फटकारल्यानंतर त्यांनी टाळे काढले.
राजस्थानमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
जयपूर : राजस्थानमध्ये २१ जिल्ह्यात शुक्रवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त मेहरा यांनी सांगितले की, मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. कोविडसंबंधी नियमांचे पालन करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ५९ पंचायत समितीच्या १,१३७ सदस्यांसाठी एकूण ३,४७२ उमेदवार आहेत.
मथुरेतील वकील सोमवारपासून जाणार संपावर
मथुरा : मोटार अपघात दावा प्राधिकारण जिल्हा न्यायालयाच्या परिसरात किंवा जिल्हा मुख्यालयाच्या परिसरातच स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी मथुरेतील सर्व वकिलांनी सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हे प्राधिकरण एका खासगी महाविद्यालयाच्या इमारतीत स्थापन करण्याच्या विरोधात एका आठवड्यापासून संपावर आहोत, असे वकील संघाचे सचिव सुनील चतुर्वेदी यांनी सांगितले.
वरातीत नाचण्यावरून चकमक, चार जण जखमी
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): नवरदेवाच्या वरातीत नाचण्यावरून दोन गटात झालेल्या चकमकीत एका महिलेसह चार जण जखमी झाले. मुबारीकपूर येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. नवरदेवाला घोड्यावर बसवून विवाहस्थळी नेताना दोघात नाचण्यावरून भांडण झाले. दोघेही नशेत होते. चकमकीत दोन्ही गटांच्या लोकांनी धारदार शस्त्र आणि लाठ्यांचा वापर केला. जखमींना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
ओडिशा सरकारच्या २७५ अवैध खाणी बंद करण्याचे आदेश
जाजपूर : ओडिशा सरकारने जाजपूर जिल्ह्यातील अवैध २७५ खाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध खनन आणि गौण खनिजांच्या तस्करीमुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने ही कारवाई करण्यात आली. या खाणी १५ दिवसाच्या आत बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस, तहसील आणि अन्य विभागांतील अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही या मोहिमेसाठी पुरेशा संख्येने पोलीस देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
प्रियकराच्या हत्येप्रकरणी पती, पत्नीला जन्मठेप
मथुरा : पतीच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवून महिला व तिच्या पतीला जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी आठ हजार रुपयांचा दंड सुनावला. जवळपास पावणेतीन वर्षांपूर्वी कोलाना गावात ही घटना घडली होती. जिल्हा न्यायालयाने आरोपी जोडप्याला दोषी ठरवून निर्णय राखून ठेवला होता. रजनीचे हरेंद्रशी प्रेमसंबंध होते. त्याला काही बहाणा करून घरी बोलावून रजनी आणि तिचा पती टेकचंदने हरेंद्रची हत्या केली.
बस थांबवून हल्लेखोरांनी केली प्रवाशाची हत्या
मुझफ्फरनगर : धावती बस थांबवून अज्ञात हल्लेखोरांनी एका प्रवाशाची गोळ्या घालून हत्या केली. ट्रान्सपोर्टनगर परिसराजवळ गुरुवारी ही घटना घडली. राधेश्याम मित्तल हे मोरनाहून बसने मुझफ्फरनगरला जात होते. अचानक दोन हल्लेखोरांनी बस थांबवून मित्तलवर गोळ्या झाडल्या. त्याला तातडीने इस्पितळात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.