रीडिंगनंतर तीन दिवसांत बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:57 AM2018-08-13T00:57:56+5:302018-08-13T00:58:18+5:30
औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत घरगुती, वाणिज्य, कृषिपंप व औद्योगिक असे सर्व मिळून ११ लाख ५० हजार वीज ग्राहक आहेत. त्यांना आता मीटर रीडिंग घेतल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत वीज बिल मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत घरगुती, वाणिज्य, कृषिपंप व औद्योगिक असे सर्व मिळून ११ लाख ५० हजार वीज ग्राहक आहेत. त्यांना आता मीटर रीडिंग घेतल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत वीज बिल मिळणार आहे. त्यासाठी महावितरणने वीज बिलांची छपाई ते वितरण व्यवस्था ही केंद्रीय वीज बिल प्रणाली आत्मसात केली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आपले वीज बिल वेळेवर भरता येईल.
महावितरणला सध्या वीज बिल छपाई ते वितरणासाठी ७ ते ८ दिवस लागतात. अनेकदा ग्राहकांना बिले उशिरा मिळतात. परिणामी, वीज बिल भरण्यास उशीर होतो. त्यामुळे त्यांना सवलतींचा लाभ मिळत नाही. आतापर्यंत वीज बिल छपाई व वितरण वेगवेगळ्या एजन्सीमार्फत केले जात होते. त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नव्हते. या अडचणींवर मात करून वीज बिल वेळीच देण्यासाठी महावितरणने केंद्रीय वीज बिल प्रणाली अवलंबिली आहे.
मोबाईल अॅप हे थेट महावितरणच्या सर्व्हरला जोडले आहे. मोबाईल अॅपद्वारे घेतलेली रीडिंग थेट सर्व्हरवर जाईल. सर्व्हरवर अंतिम बिल तयार होईल. ही सर्व प्रक्रिया अतिजलद होईल. तयार बिले एजन्सीकडे वितरणासाठी २४ तासांच्या आत पाठविले जाईल. एजन्सी पुढे २४ तासांत शहरी तर ग्रामीण भागात ७२ तासांत बिले वितरित करील.
ग्राहकांना मिळेल अचूक बिल
केंद्रीय वीज बिल वितरण प्रणाली अमलात आणणारी महावितरण ही कंपनी देशातील एकमेव आहे, असा दावा मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केला आहे. कमीत कमी मानवी हस्तक्षेप असल्यामुळे ग्राहकांना अचूक वीज बिल मिळेल. वीज बिल भरणा केंद्रातील रांगा कमी होतील. ग्राहक सेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल.
वसुली कार्यक्षमतेत वाढ व थकबाकीत घट, उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, बिलिंग, छपाई व वितरण खर्चात मोठी बचत, संपूर्ण व्यवस्थेवर केंद्रीय स्तरावरून नियंत्रण, बिलिंग तक्रारीच्या प्रमाणात घट व संपूर्ण बिलिंग व्यवस्थेवर माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने नियंत्रण, आदी फायदे होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.