कोट्यवधींचा खर्च ‘खड्ड्यात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:04 AM2017-09-05T01:04:04+5:302017-09-05T01:04:04+5:30
दरवर्षी शहरातील रस्त्यांवर सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही औरंगाबादकरांच्या नशिबी खड्डेच आहेत.
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे शहरातील १५ लाख नागरिक त्रस्त झालेले असताना महापालिका मागील आठ दिवसांपासून मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात मग्न आहे. दरवर्षी शहरातील रस्त्यांवर सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही औरंगाबादकरांच्या नशिबी खड्डेच आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील आठवड्यात दर्जेदार साहित्याचा वापर करून खड्डे बुजवा, असे आदेश दिल्यानंतरही मनपाने त्याची दखलही घेतली नाही, हे विशेष.
शहरात १३०० किलोमीटरचे रस्ते महापालिकेच्या अखत्यारीत येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २१
किलोमीटर रस्ते सोपविण्यात आले आहेत. या दोन्ही विभागांतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येतील. पावसाळा सुरू झाल्यापासून औरंगाबादकर खड्ड्यांपासून त्रस्त आहेत. अलिशान कारमध्ये फिरणाºया अधिकारी व कर्मचाºयांना या खड्ड्यांचा अजिबात त्रास होत नाही. त्यामुळे औरंगाबादकरांच्या दु:खाशी त्यांना काही देणे-घेणेही राहिलेले नाही. गणेश विसर्जन आल्यावर खड्ड्यांचा मुद्दा येतो, तेव्हा बघू म्हणून प्रशासन मागील काही दिवसांपासून खड्डे या विषयावर मौन बाळगून होते. गणपतीबाप्पांनाही पहिल्या दिवशी खड्डे चुकवत विराजमान व्हावे लागले. त्यानंतर महापालिकेने मुरूम, खडीच्या साह्याने खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू केली. गारखेडा भागात डांबराच्या साह्याने खड्डे बुजविणे सुरू होते. उर्वरित शहरात सर्वत्र मुरमाचाच राजरोसपणे वापर करण्यात आला. ज्या भागातून गणेश विसर्जन मिरवणुका जाणार आहेत, त्याच रस्त्यांवर धूळफेक डागडुजी करण्यात आली. आणखी एक मोठा पाऊस आल्यास महापालिकेचा मुरूम वाहून जाणार, हे निश्चित. कंत्राटदार तर मनपाकडून लाखो रुपये खर्च वसूलही करणार, हे सुद्धा निर्विवाद सत्य आहे.