भारतीय बौद्ध उद्योजकांची कोटीच्या कोटी उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:01 AM2019-11-24T03:01:40+5:302019-11-24T03:01:56+5:30
जागतिक परिषदेच्या माध्यमातून धम्म चळवळीला बळकटी दिली जात असतानाच बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स असोसिएशनच्या माध्यमातून परिषदेसाठी येणाऱ्या तरुणाईला आर्थिक उन्नतीची दिशाही दाखविली जात आहे.
- विशाल सोनटक्के
औरंगाबाद : जागतिक परिषदेच्या माध्यमातून धम्म चळवळीला बळकटी दिली जात असतानाच बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स असोसिएशनच्या माध्यमातून परिषदेसाठी येणाऱ्या तरुणाईला आर्थिक उन्नतीची दिशाही दाखविली जात आहे. बारा राज्यांतील साडेबारा हजार बौद्ध उद्योजकांना एकत्रित आणणाºया या असोसिएशनचे तब्बल ५५ उद्योजक परदेशात मालाची आयात- निर्यात करीत असून, यातील ४० जणांची वार्षिक उलाढाल दहा कोटीहून अधिक आहे. हे तरुण आता उद्योगांसाठी इच्छुक असणाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
बौद्ध समाजाने शिक्षणासह इतर क्षेत्रात झेप घेतली असली तरी, अपुरे भांडवल आणि भक्कम पाठबळाअभावी उद्योग, व्यवसायात हा समाज अद्यापही मागे आहे. त्यामुळेच तरुणाईला उद्योगाकडे वळविण्यासाठी २०११ मध्ये रत्नदीप आणि स्विटी कांबळे या दाम्पत्याने बुद्धिस्ट एंटरप्रिनर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशनची नागपूर येथे स्थापना केली. बौद्ध उद्योजकांना उद्योग उभारणीची माहिती देण्याबरोबरच एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय याद्वारे घेण्यात आला. याबरोबरच उद्योजकांना एकमेकांशी जोडत त्यांच्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचे आदान- प्रदान करणे आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले.
मालाचे मार्केटिंग आणि बाजारपेठेची माहिती देण्यात येऊ लागली. तसेच व्यवसायात उतरू इच्छिणाºया तरुणांना व्यवसायाच्या निवडीपासून कर्ज प्रकरण, विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येऊ लागले. असोसिएशनच्या माध्यमातून उद्योग सुरू करणाºया तरुणांची एक फळीच राज्यभरात उभी राहिली. आज महाराष्ट्रासह बारा राज्यांतील साडेबारा हजार उद्योजक याद्वारे एकत्रित आले असून, येणा-या दिवसात राज्यातील प्रत्येक तालुक्यात बौद्ध उद्योजकांचे भक्कम जाळे उभारण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रत्नदीप कांबळे यांनी सांगितले.