सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत कोट्यवधींची यंत्रसामग्री वर्षभरापासून पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 07:35 PM2021-05-25T19:35:47+5:302021-05-25T19:41:00+5:30
घाटीत केंद्र सरकारचे १२० कोटी रुपये आणि राज्य सरकारचे ३० कोटी अशा अर्थसाहाय्यातून सुपर स्पेशालिटी ब्लाॅकची इमारत उभी आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या १५० कोटींच्या निधीतून घाटीत उभे राहिलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत गेल्या वर्षभरापासून कोट्यवधींची यंत्रसामग्री वापराविना पडून आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हाेणारी कॅथलॅब, सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची यंत्रे धूळ खात आहे. रुग्णसेवेत येण्यापूर्वीच वापराविना या कोट्यवधींच्या यंत्रांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, कोरोना प्रादुर्भावात यंत्रसामग्रींकडे दुर्लक्ष होत आहे.
घाटीत केंद्र सरकारचे १२० कोटी रुपये आणि राज्य सरकारचे ३० कोटी अशा अर्थसाहाय्यातून सुपर स्पेशालिटी ब्लाॅकची इमारत उभी आहे. या ठिकाणी युराेलाॅजी, नेफ्राॅलाॅजी, न्यूराॅलाॅजी, कार्डियाेलाॅजी, निओनॅटाॅलाॅजी, वर्न-प्लास्टिक सर्जरी, आदी सुपर स्पेशालिटी उपचार देण्याचे नियाेजन आहे. परंतु, गेल्या वर्षभरापासून या इमारतीत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सगळ्यात या उपचारांसाठी दाखल झालेली कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री तशीच पडून आहे. यंत्रसामग्री प्लास्टिकच्या पोत्यांनी झाकून ठेवण्याची वेळ ओढवली आहे. प्रत्येक यंत्राचा एक वाॅरंटी, गॅरंटी कालावधी असतो. यंत्रसामग्री इमारतीत बसवून झाली आहे. परंतु, रुग्णांना वापरच होत नसल्याची स्थिती आहे. जेव्हा ही यंत्रे रुग्णसेवेत आणली जातील, तोपर्यंत ती सुरक्षित राहतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी सुपर स्पेशालिटी ब्लाॅकचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांना विचारले असता, इमारतीत सध्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे ऑपरेशन थिएटर सुरू करण्यासाठी मर्यादा पडत आहे. कॅथलॅबच्या इन्स्टाॅलेशनचे काम पूर्ण झाले आहे. कॅथलॅब सुरू करण्यासाठी परवानगी मागितली असून, परवानगी येताच योग्य ती कार्यवाही केली जाईल.
कॅथलॅबची २.१९ कोटींची यंत्रसामग्री
टर्न की प्रकल्पात पाचव्या मजल्यावर कॅथलॅब साकारण्यात आली आहे. याठिकाणी तब्बल दोन कोटी १९ लाख १० हजार रुपयांची यंत्रसामग्री बसविण्यात आलेली आहे. यात हिमोडायनामिक रेकाॅर्डर, डिफ्रिलेटर, ऑपरेशन लॅब वीथ लेड ग्लास, एव्हॅटिक बलून पंप, अनेस्थेशिया वर्क स्टेशन, आदींचा समावेश आहे. या इमारतीत एकूण सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सज्ज झाले आहे. त्यातील यंत्रसामग्रींची किंमत किमान १० कोटींची असल्याचे समजते. पण, त्यांचा वापर सुरूच झालेला नाही.
अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होऊ शकते सुरू
सुपर स्पेशालिटी इमारतीत कॅथलॅब तत्काळ सुरू होऊ शकते. कॅथलॅब कार्यान्वित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी मिळताच घाटीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सुरू होऊ शकते. घाटीत त्यासाठी मानद तज्ज्ञही उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांपासून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी घाटीत होत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे.
यंत्रे कार्यान्वित झाल्यानंतर वाॅरंटी कालावधी
सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत सध्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. या ठिकाणी कॅथलॅब कार्यान्वित करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. यंत्रसामग्री ज्या दिवशी सुरू होतील, तेथून पुढे वाॅरंटी कालावधी राहील.
- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)