'कोट्यवधींचे युनिफॉर्म पडून'; शालेय गणवेश उद्योगाला २५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 05:04 PM2021-05-27T17:04:18+5:302021-05-27T17:30:51+5:30

कोरोना परिस्थितीमुळे यंदाही शाळा सुरू होणार नाहीत असे संकेत मिळत आहेत.

'Billions of uniforms unsold '; 25 crore blow to school uniform industry in Aurangabad | 'कोट्यवधींचे युनिफॉर्म पडून'; शालेय गणवेश उद्योगाला २५ कोटींचा फटका

'कोट्यवधींचे युनिफॉर्म पडून'; शालेय गणवेश उद्योगाला २५ कोटींचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देराजस्थानमधील भिलवाडा व राज्यातील भिवंडी या शहरांतील मिलमधून गणवेशाचे कापड खरेदी केले जाते. सोलापूर येथील सुमारे ४५० युनिटमध्ये राज्यातील शाळांचे गणवेश शिवले जातात.हेच रेडिमेड गणवेश शहरातील १५ मोठे वितरक विद्यार्थ्यांना विकतात.

औरंगाबाद : यंदाही शाळा उघडण्यासारखी परिस्थिती दिसत नाही. ऑनलाइन शिक्षणावरच भर राहणार आहे. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेश उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शहरात सुमारे २५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत. यंदाही कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. मुलांवर तिचा परिणाम होऊ शकतो, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या परिस्थितीमुळे यंदाही शाळा सुरू होणार नाहीत असे संकेत मिळत आहेत. ऑनलाइन शिक्षणावरच शाळांचा भर असणार आहे. याचा फटका शालेय गणवेश उद्योगाला बसला आहे. शहरात शालेय गणवेशाचे १५ वितरक आहेत. राजस्थानमधील भिलवाडा व राज्यातील भिवंडी या शहरांतील मिलमधून गणवेशाचे कापड खरेदी केले जाते. सोलापूर येथील सुमारे ४५० युनिटमध्ये राज्यातील शाळांचे गणवेश शिवले जातात. हेच रेडिमेड गणवेश शहरातील १५ मोठे वितरक विद्यार्थ्यांना विकतात. नवीन शैक्षणिक वर्षासाठी गणवेशांची ऑर्डर देण्याची सुरुवात जानेवारी-फेब्रुवारीपासूनच सुरू होते. गणवेश बदलणार असेल तर शाळा व्यवस्थापन फेब्रुवारीतच त्याची सूचना वितरकांना देत असतात. त्यानुसार गणवेशांची तयारी सुरू होते.

मागील वर्षी मार्च अखेरीस लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा शहरातील वितरकांकडे ऑर्डरनुसार ५० टक्केे सुमारे १५ कोटींचे गणवेश दाखल झाले होते. लॉकडाऊन व ऑनलाइन शाळांमुळे गणवेश विक्री झाली नाही. डिसेंबर - जानेवारीत नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले होते. पण, आठवड्याभरात तेही बंद झाले. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. मागील वर्षीच्या अनुभव लक्षात घेता यंदा वितरकांनी नवीन गणवेश मागविण्याचे धाडस केले नाही. मागील वर्षीचा साठा अजून पडून आहे. ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका वितरकांनी घेतली आहे.

गणवेश उद्योग ठप्प
औरंगाबाद नव्हेतर, संपूर्ण देशातील गणवेश उद्योग ठप्प आहे. भिलवाडा व भिवंडी येथील कापड मिल बंद आहे. सोलापूर येथील शिलाई युनिट बंद आहेत. तिथे आंध्र प्रदेशातील लोक शिलाईकाम करतात. ते आपल्या गावी गेले आहेत. शाळा उघडण्यासारखी परिस्थिती नाही. याचा परिणाम झाला आहे. गणवेश रिटेलरची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली असून शहरात २५ ते ३० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
- रोमी छाबडा,गणवेश वितरक

Web Title: 'Billions of uniforms unsold '; 25 crore blow to school uniform industry in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.