Bio Diversity Day : मानवी जीवन समृद्ध करणारी माळराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 08:07 AM2019-05-22T08:07:00+5:302019-05-22T08:10:02+5:30

आजच्या बेसुमार आणि अंधाधुंद मानवी हस्तक्षेपामुळे आणि जमीन वापरामुळे माळरानाची खूपच परवड झाली आहे.

Bio Diversity Day: hill stations that enhances human life | Bio Diversity Day : मानवी जीवन समृद्ध करणारी माळराने

Bio Diversity Day : मानवी जीवन समृद्ध करणारी माळराने

googlenewsNext

- डॉ. सुजित नरवडे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

अवर्षणग्रस्त प्रदेशात तग धरून राहण्यासाठी माळरान ही परिसंस्था विकसित झालेली आहे. उत्क्रांतीच्या काळात गवत, खुरट्या आणि काटेरी वनस्पतींवर गुजराण करण्याकरिता, इथल्या प्राणिजगताने स्वत:मध्ये बरेचसे बदल केले. ऋतुमानानुसार इथल्या नैसर्गिक साधन-संपत्तीमध्ये बदल दिसून येतो, ज्याचा इथल्या प्राणिजगतावर थेट परिणाम होत असतो. जसे की, इथल्या प्राण्यांचा प्रजनन काळ हा बहुतांशी पावसावर अवलंबून असतो आणि त्यामुळे प्रखर उन्हाळ्यानंतर येणारा वसंत ऋतू खूप काही बदल घडवून आणतो. 

बऱ्याच वेळा माळरानांना एक विशिष्ट वन प्रकार किंवा पारिस्थितीकी असे न समजता, पडीक ओसाड जमिनी समजून दुर्लक्ष केले जाते. माळराने ही एक समृद्ध परिसंथा असून, ती विविध पारिस्थितीकीय सेवा पुरवतात. विविध प्रकारची पिके, जनावरांना चारा, मृदासंधारण, जलसंचय, परागीकरण, नैसर्गिक कीटनियंत्रण, अन्नद्रव्यांचे प्रचलन, कर्ब शोषण इ. महत्त्वाच्या सेवा माळरानाकडून मानवाला, तसेच इतर निसर्ग घटकांना पुरविल्या जातात. ही परिसंस्था फक्त मातकट रंगाची नाही किंवा गवताळ हिरव्या रंगाचीही नाही, तर मानवी जीवन समृद्ध करणारे, तसेच रसपूर्ण करणारे असंख्य रंग इथे तुम्हाला पाहावयास मिळतील. 

आजच्या बेसुमार आणि अंधाधुंद मानवी हस्तक्षेपामुळे आणि जमीन वापरामुळे माळरानाची खूपच परवड झाली आहे. माळरानावर अवलंबून असणाऱ्या जैवविविधतेवर याचे दूरगामी परिणाम होत आहेत आणि बऱ्याच वेळा ते आपल्याला उशिराच उमजले आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे इथल्या माळरान हा अधिवास प्रचंड गतीने लोप पावत आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपविरहित माळरानावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी कमी झाली आहे. जमिनीवर राहणाऱ्या सरीसृप- पंखवाल्या गळ्याचा सरडा; पक्षी झ्र तणमोर, तुरेवाला चंडोल, चिमण चंडोल, भारतीय धाविक, लावी, पखुर्डी, माळटिटवी, तसेच सस्तन प्राणी - भारतीय करडा लांडगा, खोकड यांचीही गत माळढोकासारखीच होत आहे.

माळढोक विनाशाच्या उंबरठ्यावर
माळढोक म्हणजे माळरानावर अवलंबून असणाऱ्या वन्यजीवांचा एक प्रतिनिधीच. अत्यंत धोकादायक परिस्थितीत असलेला हा पक्षी आता विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. प्रजनन काळात नर पक्षी त्याच्या गळ्यातली पिशवी फुगवतो आणि शेपटी फुलवून पाठीवर टाकतो. मादी एकच अंडे आणि तेही खडकाळ जागी घालते. परिसरातील १०० कि.मी.पर्यंतच्या भागात हा पक्षी जाऊ शकतो. हा सर्वाहारी पक्षी आहे आणि गवताच्या बिया, फळे, किडे, उंदीर, पाली तसेच शेतांमधील भुईमूग, ज्वारी, सूर्यफूल यावरही याची गुजराण चालते. १९७९ साली सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या अवर्षणग्रस्त भागात माळढोक पक्ष्यासाठी अभयारण्य स्थापन झाले. या अभयारण्यात दक्खनच्या पठाराचा भाग, दक्षिणी पट्ट्यातील झुडपी व काटेरी वने आणि कोरड्या पानझडीच्या जंगलाचे काही पट्टे यांचा समावेश होतो. माळढोक दक्खनच्या पठारावर काही दशकांपूर्वी सगळीकडे सामान्यपणे दिसायचे, त्यांची संख्या आता अगदी बोटांवर मोजण्याइतकी राहिली आहे. 

Web Title: Bio Diversity Day: hill stations that enhances human life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.