जैवविविधता प्रकल्प मार्गी लावणार
By Admin | Published: July 11, 2014 12:45 AM2014-07-11T00:45:01+5:302014-07-11T01:04:04+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर हा नैसर्गिक साधनसामग्री व जैविक विविधतेने नटलेला आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर हा नैसर्गिक साधनसामग्री व जैविक विविधतेने नटलेला आहे. या परिसराच्या विकासासाठी जैवविविधता (‘बायोडायव्हर्सिटी पार्क’) हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही रोहयो व जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रोजगार हमी योजना, तसेच जलसंधारण विभागातर्फे राज्यभरात विद्यार्थी, पालक व नागरिक यांच्यासोबत संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी विद्यापीठामध्ये ‘दुष्काळ, पाणीटंचाई निर्मूलन’ या विषयावर विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. व्यासपीठावर राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. एच. एम. देसरडा व कुलसचिव डॉ. धनराज माने यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी नितीन राऊत आपल्या भाषणात म्हणाले की, मागील पाच वर्षांत ३ हजार २१८ बंधाऱ्यांचे काम हाती घेतले. यापैकी २ हजार बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले. परिणामी, मराठवाड्यात मोसंबी व डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात बहरल्या.
कार्यक्रमाचे बीजभाषण डॉ. देसरडा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. माने यांनी केले. डॉ. चेताना सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. राजेश करपे यांनी आभार मानले.
३१ कोटींचे प्रस्ताव सादर
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू डॉ. चोपडे व कुलसचिव डॉ. माने यांनी मंत्री राऊत यांना दोन प्रस्ताव सादर केले. त्यामध्ये विद्यापीठ परिसरातील विहिरींची खोली वाढविणे व बांधणी करणे, हा १० कोटी रुपयांचा व दुसरा ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ हा २१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.